Thu, Jul 16, 2020 09:14होमपेज › Konkan › कोकणात राष्ट्रवादी पुन्हा उभारी घेईल

कोकणात राष्ट्रवादी पुन्हा उभारी घेईल

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 8:43PMचिपळूण : प्रतिनिधी

कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा जनाधार असून आगामी निवडणुकांत पक्षाला पुन्हा चांगले यश मिळेल. पक्ष कार्यकर्त्यांनी नाउमेद न राहता पक्ष संघटनेसाठी झोकून काम करावे. दोन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी राष्ट्रवादीने मोठे योगदान दिले आहे, असा निर्वाळा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास माने यांनी चिपळूण येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

येत्या आठवड्यापासून विलास माने यांचा सिंधुदुर्ग दौरा सुरू होत असून, या दौर्‍यात सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत निवडणुका पार पाडल्या जाणार आहेत. केंद्रीय अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत विलास माने यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षांतर्गत निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. विलास माने सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी आहेत. 

दोन्ही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले जनसमर्थन असून भविष्यात पक्षसंघटना खोलवर बांधणीसाठी अभियान हाती घेतले जाणार आहे. आगामी निवडणुका काँग्रेसबरोबर आघाडी करून लढविण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रवादी पक्षाला स्वत:ची ध्येयधोरणे असून शरद पवार यांच्यासारखा नेता या पक्षाला मिळाला. राष्ट्रवादी कार्यकर्ता कुठल्याही धमकी व आमिषाला बळी न पडता रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या विकासकामांसाठी कटिबद्ध राहिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची स्थिती मजबूत असून भास्कर जाधव, संजय कदम व जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यासारखे नेतृत्व पक्षाकडे आहे. सिंधुदुर्गातही व्हिक्टर डॉन्टस्, सुरेश दळवी यांच्यासारखे पदाधिकारी पक्षाकडे आहेत. आगामी काळात दोन्ही जिल्ह्यांतील कमजोर विभागामध्ये पक्ष कार्यकर्त्याला उभारी देण्यासाठी गाव संवाद मिटिंगचा कार्यक्रम आखला जाणार असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना विलास माने यांनी सांगितले.