Thu, Apr 25, 2019 17:30होमपेज › Konkan › यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतंत्र अस्तित्व

यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतंत्र अस्तित्व

Published On: Aug 23 2018 10:53PM | Last Updated: Aug 23 2018 10:41PMसावंतवाडी  ः प्रतिनिधी

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी  ग्राऊंड लेव्हलवर उतरून प्रयत्न करण्यात येतील. कार्यकर्ते, नेते यांच्या मतांची जाणीव आहे. भविष्यात कार्यकर्ते व नेत्यांमधील दरी कमी करून जनसंपर्क वाढविण्यासाठी जिल्हा पिंजून काढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

आगामी लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाची आघाडी पक्ष करेल हे पक्षश्रेष्ठी ठरवतील, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश गवस यांची निवड झाली. त्यानंतर सालईवाडा येथे  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी धर्माजी बागकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा उपाध्यक्ष उदय भोसले, सावळाराम अणावकर, प्रफुल्ल सुद्रीक, खेमराज भाईप, सत्यजित देशमुख, रामानंद शिरोडकर, अशोक पवार, गुरुदत्त कामत, एम. डी. सावंत, अशोक सावंत, तुषार भोसले, रवी राऊळ, प्रसाद बर्वे, रंजन चिके आदी उपस्थित होते .

जिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होती. मात्र,  सत्ता कारणामुळे राष्ट्रवादीच्या काही लोकांनी अन्य पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी कमकुवत झाली होती. मात्र, यापुढे पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करु. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी माझ्यावर जबाबदारी सोपविली. अजित पवार तसेच पक्षनिरीक्षक विलास माने व अन्य पदाधिकार्‍यांनी माझ्यावर जो विश्‍वास टाकला आहे तो सार्थ ठरविणार  असल्याचे  गवस यांनी सांगितले.

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन कार्यकर्त्यांच्या वेदना जाणून घेऊन पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करु. सभासद नोंदणीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत यांच्या नेतृत्वाखाली मी माझ्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर राजकारण आणि समाजकारणात कायमच आघाडीवर राहिल्याचे गवस यांनी सांगितले.
रोजगार व लघु उद्योगाबाबत तरुणांना जाणीव व जागृती करण्यासाठी वेळ देणार आहे, असे गवस यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेल संघटना बांधणीसाठी प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून त्यांना पक्षात सक्रीय करून जिल्ह्यात राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करु, असे गवस यांनी सांगितले.

यावेळी सावळाराम अणावकर, उदय भोसले व प्रफुल्ल सुद्रीक यांनी शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी यापुढील काळात गावागावात पोहोचण्याची ग्वाही दिली.