कुडाळ : वार्ताहर
महामार्गावरील खड्ड्यांबाबत जोरदार घोषणा बाजी करत बांधकाम मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्यासह त्यांच्या गाड्यांचा कुडाळ येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी रोखल्या.यावेळी महामार्गाच्या दैयनिय स्थितीकडे लक्ष वेधत खड्डे किती दिवसात बुजवणार असा प्रश्न उपस्थित केला. गणेशोत्सव तोंडावर असताना खड्ड्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत. अन्यथा भाजपच्या मंत्र्यांची एकही गाडी जिल्ह्यात फिरू दिली जाणार नाही,असा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देण्यात आला. यावर ना. पाटील यांनी येत्या चार दिवसात खड्डेे बुजविण्यात येणार असल्याचे सांगत खड्डेे बुजविण्याचे काम युध्द पातळीवर असल्याचे स्पष्ट केले.
कुडाळ उद्यमनगर येथे जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने खड्ड्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाड्यांचा ताफा अडवून या बाबत चर्चा केली तसेच निवेदन दिले. ना.पाटील यांनी खड्डे बुजविण्याचे काम चालू असून येत्या काही दिवसात महामार्ग वाहतुकीसाठी सुस्थितीत होईल,अशी ग्वाही दिली.कुडाळमधील मागणी नुसार फ्लायओव्हर लवकरच मंजुर करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, जिल्हा उपाध्यक्ष उदय भोसले, प्रांतिक सदस्य पुष्पसेन सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य शिवाजी घोगळे, तालुकाध्यक्ष भास्कर परब, प्रफुल्ल सुद्रीक, आत्माराम ओटवणेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.