Mon, Mar 18, 2019 19:19होमपेज › Konkan › राष्ट्रवादीची हवाई वारी तर सेनेची गोवा टूर

राष्ट्रवादीची हवाई वारी तर सेनेची गोवा टूर

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 8:48PMचिपळूण : खास प्रतिनिधी

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक रंगतदार अवस्थेत आली आहे. मतदार बाजूला जाऊ नयेत यासाठी शिवसेना आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादीकडून जोरदार ताकद लावण्यात येत असून मतदारांना बांधून ठेवण्यासाठी विशेष टूर पॅकेजचे आयोजन करण्यात आले आहे. सेनेचे राजीव साबळे, राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे रिंगणात आहेत. 21 मे रोजी मतदान होत असताना त्याआधीच राष्ट्रवादीच्या मतदारांची विमानवारी तर सेनेचे मतदार गोवा टूरवर निघाले आहेत.

विधान परिषद निवडणुकीत चुरशीचा सामना आहे. यावेळी शिवसेनेचे राजीव साबळे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आ. सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे रिंगणात आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेस, स्वाभिमान, मनसे, शेकाप अशी आघाडी केली आहे. दुसर्‍या बाजूला पालघर लोकसभा निवडणुकीच्या मुद्यावरून कोकणातील सेना-भाजप युतीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे भाजपचे मतदार या विधान परिषद निवडणुकीत सेना उमेदवाराला कितपत मदत करतील हे प्रश्‍नचिन्ह आहे. निवडणुकीला पाच दिवस असताना राष्ट्रवादीच्या मतदारांनी अज्ञातस्थळी उड्डाण केले आहे. शिवसेनेचे मतदार गोव्याकडे मार्गस्थ झाले आहेत. या निवडणुकीमध्ये जि. प. सदस्य, नगरसवक व पंचायत समिती सभापतींना मतदानाचा हक्‍क आहे. त्यामुळे सेना आणि राष्ट्रवादी पक्षाने आपली मते फुटू नयेत याची काळजी घेण्यासाठी हक्‍काच्या मतदारांना अज्ञातस्थळी हलविले आहे. 

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात रायगडमध्ये मतदारांची संख्या अधिक आहे. दोन्ही उमेदवार रायगडचेच असल्याने चुरशीचा सामना  आहे. निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना पदाधिकारी नाराजी व्यक्‍त केली आहे. मतदारसंघात सेनेचे पारडे जड असताना राष्ट्रवादीने केलेल्या आघाडीमुळे चुरस निर्माण झाली आहे. दुसर्‍या बाजूला आ. तटकरे यांना विधान परिषद निवडणुकीचा पूर्ण अनुभव आहे. आता तर त्यांचेच चिरंजीव रिंगणात असल्याने आ. तटकरे यांनी पूर्ण ताकद लावली आहे. दुसर्‍या बाजूला अनेक अपक्ष मतदारांबाबत सेना उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट केले नाहीत. दरम्यान, शिवसेना व राष्ट्रवादीचे मतदार अज्ञातवासात गेले आहेत.