Wed, Jul 24, 2019 05:57होमपेज › Konkan › साडेचार लाख पचविण्यासाठीच खून  : उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे

साडेचार लाख पचविण्यासाठीच खून  : उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 10:23PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जमीन व्यवहाराप्रकरणी मुंबईहून संगमेश्‍वर येथे आलेल्या विवाहितेचा खून आर्थिक देवाणघेवाणीतूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच सुमारे 22 लाख 50 हजार रुपयांचा हा जमीन व्यवहार बनावट असून आपला बनाव  उघडकीस येईल व एकूण रकमेपैकी घेतलेली 4 लाख 50 हजार रुपयांची रक्‍कम परत करावी लागेल, या भीतीतूनच संशयित श्रीकांत टोलू घडशीने विवाहितेची हत्या केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शिरीष सासने उपस्थित होते.

घडशीला 29 जुलै रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुंबईतून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने स्मिता कुसूरकर यांच्याकडून 21 जून 2017 रोजी 4 लाख 50 हजार रुपये घेतल्याची त्यानंतर आपले बिंग फुटेल व घेतलेली रक्‍कम परत करावी लागेल, या भीतीतून खून केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात श्रीकांतचे अजून कोणी साथीदार आहेत का ? तसेच त्याने स्मिता कुुुसूरकर यांच्याकडून आणखी किती रक्‍कम घेतली याचा पोलिस तपास करत असल्याचेही प्रणय अशोक यांनी सांगितले. 

श्रीकांत घडशीची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीचीच 

श्रीकांत घडशीने 2009 मध्ये आपल्या पत्नीचा खून करुन तिचा मृतदेह विहिरीत फेकला होता. परंतु, सबळ पुराव्याअभावी या खटल्यातून त्याची निर्दोष मुक्‍तता झाली होती. तसेच कारागृहात असताना  तेथे मारामारी आणि गावात त्याच्यावर मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत आणि आता हा स्मिता कुसूरकरांच्या हत्येचा, असे एकूण चार गुन्हे श्रीकांत घडशीवर दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले.