Sun, Dec 15, 2019 02:27होमपेज › Konkan › नगरसेवक राड्ये सेनेत

नगरसेवक राड्ये सेनेत

Published On: Jan 14 2019 1:20AM | Last Updated: Jan 14 2019 12:56AM
लांजा : विशेष प्रतिनिधी

लांजा नगरपंचायतीमधील भाजप -राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्या शहरविकास आघाडीतील नगरसेवक मदन राड्ये यांनी रविवारी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेचे नगरपंचायतीमधील सत्तास्थान मजबूत झाले आहे. 

नगरपंचायतीच्या तत्कालिन नगराध्यक्षा संपदा वाघधरे यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये संपदा वाघधरे यांनी पुन्हा अर्ज दाखल केला होता. मात्र, यावेळी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी लांजा 

नगरपंचायतीमधील शहरविकास आघाडीतील परवेश घारे, सुगंधा कुंभार, मनोहर कवचे व मुरलीधर निवळे या चार नगरसेवकांनी पक्षादेशाला केराची टोपली दाखवित शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू कुरूप यांच्या पारड्यात आपली मते टाकली होती. त्यामुळे राजू कुरूप हे नगराक्षपदी विराजमान झाले होते. त्यानंतर हे चारही नगरसेवक शिवसेनेमध्ये डेरेदाखल झाले होते. त्यामुळे शिवसेनेचे नगरपंचायतीमधील संख्याबळ दहावर पोहोचले होते. मात्र, त्यानंतर शहरविकास आघाडीतील नगरसेवक मदन राड्ये हेदेखील शिवसेनेच्या वाटेवर होते. त्यांनी रविवारी झालेल्या कार्यक्रमात आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचे नगरपंचायतीमधील संख्याबळ 11 वर जावून पोहोचले आहे. 

दरम्यान, लांजा नगरपंचायतीच्या कुवे गावातील 15, 16 व 17 या तीनही प्रभागातील नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केल्याने याठिकाणी शिवसेनेची ताकद वाढली आहे.