Fri, Apr 26, 2019 20:15होमपेज › Konkan › समुदाय संवादासाठी मुंबई-गोवा मोटारसायकल रॅली

समुदाय संवादासाठी मुंबई-गोवा मोटारसायकल रॅली

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 9:01PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

तटरक्षक दल, पोलिस, ओएनजीएस, कस्टम, फिशरिज या विभागांच्या एकूण 36 जवानांचा व कर्मचार्‍यांचा ताफा 9 दिवसांच्या मुंबई ते गोवा व परत माघारी अशा सुमारे 1350 किमी अंतराच्या मोटारसायकल रॅलीसाठी मुंबई येथील तटरक्षक मुख्यालयातून रवाना झाला. सोमवारी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ येथे मच्छीमार समुदायाबरोबर संवाद साधला.

रॅलीची सुरुवात दि. 2 जून रोजी सकाळी 11 वाजता तटरक्षक दलाच्या पश्‍चिम क्षेत्र मुख्यालयातून महाराष्ट्र शासनाचे मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांच्याद्वारे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. 

मुंबईहून गोव्याकडे निघालेला जवानांचा हा ताफा सोमवारी दाभोळ येथे सकाळी 10 वा आला. तत्पूर्वीच तटरक्षक दल रत्नागिरीने स्थानिक पोलिस व महसूल विभागांच्या मदतीने ग्रामपंचायत हॉल, दाभोळ येथे समुदाय संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. येथे तटरक्षक दल रत्नागिरीचे स्टेशन कमांडर कमांडंट एस. आर. पाटील, पोलिस दलाचे पोलिस निरीक्षक लाड, पोलिस निरीक्षक तायडे, फिशरिज विभागाचे सहायक आयुक्‍त साळुंखे, ‘सीआयएसएफ’चे उप समदेशक इंदोरीया आदी मान्यवरदेखील मोटारसायकल रॅलीच्या स्वागतासाठी सज्ज होते. यावेळी जमलेल्या एकूण 300 मच्छीमारांना संबोधित करताना कमांडंट पाटील म्हणाले की, मच्छीमार समुदाय हा तटरक्षक दलासाठी डोळे आणि कान यांचे काम करतो. कारण मासेमारी करीत असताना समुद्रात एखादी संशयास्पद हालचाल आढळताच मच्छीमार बांधव तटरक्षक दलाच्या गस्ती नौकांना किंवा पोलिसांना त्वरित सूचित करतात. 

त्यामुळे मच्छीमार समुदायास जीविताचे संरक्षण, सध्याच्या काळात देशाला समुद्रामार्गे भेडसावणारे सुरक्षिततेचे प्रश्न, शोध आणि बचाव मोहीम, सागरी प्रदूषण, जीवन संरक्षक उपकरणे, संकटकालीन इशारे, प्रथमोपचार इत्यादी बाबींची माहिती देण्यासाठी तटरक्षक दलातर्फे वारंवार असे समुदाय संवाद कार्यक्रम राबबिले जातात. 

या उपक्रमाचा उद्देश मुख्यत: मच्छीमार समुदायाशी संवाद साधणे हा आहे.  यासाठी या सैनिक दलाने मुरुड (2 जून सायं 5 वा.), श्रीवर्धन (3 जून दुपारी 3 वा.), दाभोळ (4 जून सकाळी 11 वा.), जयगड (4 जून दुपारी 3 वा.) संवाद साधला असून देवगड (5 जून दुपारी 2 वा.), वेंगुर्ला (6 जून सकाळी 10 वा.), मालवण (7 जून सायंकाळी 4 वा.) व मिरकरवाडा (8 जून सायं. 5 वा) येथेही ते रॅलीच्या पुढच्या प्रवासात समुदाय संवाद कार्यक्रम राबणार आहेत. 

आठ किनारी गावांमध्ये हा कार्यक्रम राबवितांना तटरक्षक दलास पोलिस, महसूल विभाग, मत्स्यव्यवसाय विकास विभाग आणि स्थानिक मच्छिमार सोसायट्या यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. या दरम्यान स्वच्छ व सुरक्षित सागरी पर्यावरण आणि सागरी सुरक्षा याबाबत मच्छिमार बांधवांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा समुदाय संवाद आयोजित करण्यात येणार असून या रॅलीचे नेतृत्व  तटरक्षक दलाचे असिस्टंट कमांडंट अजय दहिया यांच्याकडे आहे.