Thu, Jun 20, 2019 02:16होमपेज › Konkan › अन्यथा बेलदार समाजाचे चक्‍का जाम

अन्यथा बेलदार समाजाचे चक्‍का जाम

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 9:23PMचिपळूण : प्रतिनिधी

संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग उखडला आहे. या महामार्गावर सामान्य जनतेला प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. सामान्य जनतेचा वेदनामयी प्रवास राज्यकर्त्यांना दिसत नाही ही कोकणवासीयांची शोकांतिका आहे. याकडे लक्ष द्यावे, अन्यथा बेलदार समाज चक्‍का जाम करेल, असा इशारा बेलदार समाजाचे राज्य अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. परंतु, ते कामही राजकीय भूमिका घेऊन केले जात आहे. या कामामध्ये कोणतीही शिस्त नाही, गुणवत्ता नाही. ठेकेदारांची मनमानी सुरू आहे. महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी या सगळ्या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. महामार्गाचे कोणतेही अधिकारी संवेदनशीलपणे काम करीत आहेत, असे चित्र नाही. खराब झालेल्या महामार्गाची दुरूस्ती संबंधित ठेकेदारांकडे आहे. त्याचा साप्‍ताहिक अहवाल बंधनकारक आहे. परंतु, महामार्ग विभागाचे अधिकारी का ऑडिट करीत नाहीत?, असा सवाल चव्हाण यांनी केला. 

संपूर्ण महामार्ग खड्ड्यांत गेला आहे. कोकणच्या जनतेचा सातत्याने अंत पाहिला जात आहे. या रस्त्यावरील प्रवास म्हणजे मरणयातना असून त्यामुळे वेळ वाया जातोच, पण  वाहनांना फटका बसत आहे. सातत्याने या मार्गावरून बडे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी प्रवास करीत असतात. पण त्यांचेही दुर्लक्ष होत आहे. संवेदनशून्य  लोकप्रतिनिधी कोकणात मिळाल्याने कोकणातील जनतेचा प्रवासही आता मरणासन्‍न अवस्थेत सुरू झाला आहे.

एकीकडे पर्यटनाच्या गप्पा मारायच्या, दुसरीकडे रस्त्यांची दुरवस्था बेदखल करायची, हा कोकणविषयी सापत्न भाव असून पुढील महिन्यात येणार्‍या गणेशोत्सवामुळे तर चाकरमान्यांचा प्रवास खडतर होणार आहे. महामार्ग बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदारांनी पुढील आठ दिवसांमध्ये दुरूस्तीचे काम हाती घेतले नाही तर चक्‍का जाम करू. संपूर्ण बेलदार समाज व काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर येतील, असा इशारा यावेळी शिवाजीराव चव्हाण यांनी दिला.