Wed, Jan 22, 2020 14:02होमपेज › Konkan › मुंबई-गोवा महामार्ग धोकादायक

मुंबई-गोवा महामार्ग धोकादायक

Published On: Jun 22 2019 1:04AM | Last Updated: Jun 22 2019 1:04AM
लांजा  : जगदीश कदम 

महामार्गावर तालुक्यातील वाकेड, वेरळ व आंजणारी घाटात चौपदरीकरणासाठी केलेल्या खोदाईमुळे गटारे आणि नैसर्गिक प्रवाह बुजल्याने महामार्ग धोकादायक बनला आहे. बुधवारी पडलेल्या पावसाने वाकेड घाटात मोरी खचल्याने महामार्गाला पडलेले भगदाड मोठ्या संकटाला निमंत्रण ठरले होते. या घटनेमुळे येत्या पावसाळ्यात वाहतूक ठप्प व गंभीर अपघात होणार नाहीत यादृष्टीने आतातरी महामार्ग विभागाचे डोळे उघडतील का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. 

पावसाळ्याच्या अगोदर ही कामे करणे गरजेचे होते. परंतु, संबंधित विभाग आणि ठेकेदार यांनी चौपदरीकरणाच्या नावाखाली या केलेला कानाडोळा सर्वार्थाने मारक ठरणारा आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात लांजा शहरासह वाकेड, वेरळ, आंजणारी या घाट भागातील गटारे, मोर्‍या बुजल्याने येत्या पावसाळ्यातील पाण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसाने महामार्गावर वाकेड घाटीत मोरी खचली. वेळीच लक्षात आले नसते तर मोठ्या अनर्थाला सामोरे जावे लागले असते. दरम्यान महामार्ग खचण्याची समस्या येथील घाटभागासह बाजारपेठेतही ‘आ’ वासून उभी आहे. नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बुजल्याने ही समस्या वाढली आहे. महामार्गावर खोदाई केलेल्या डोंगराचा भराव, चिखल, माती, दगड येवू नयेत, यासाठी संबधित ठेकेदार व प्रशासन यांनी काळजी घेणे गरजेचे होते. मात्र, याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाची उदासीनता आणि ठेकेदाराचा बेफिकिरीपणा कारणीभूत आहे. 

कितीही मुसळधार पाऊस पडला तरी लांजा शहरासह ग्रामीण भागात पावसाच्या पाण्याच्या पुराचा धोका कधीच होत नाही. तर येथील दळणवळणही कधीच ठप्प होत नाही. मात्र, सध्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जोरदारपणे सुरू आहे. लांजा तालुक्यातील वाकेड, वेरळ, आंजणारी घाट येथे डोंगर फोडून महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात घाट सेक्शनची खोदाई होत असल्याने रस्त्याची गटारे, मोर्‍या बुजली गेली आहेत तर नैसर्गिक प्रवाह बुजल्याने मोठ्या प्रमाणात पडणारे पावसाचे पाणी खोदाई केलेल्या मातीसह रस्त्यावर येत आहे. 30 एप्रिल रोजी पडलेल्या अवकाळी किरकोळ पावसाने वाकेड घाटात  मोठ्या प्रमाणात डोंगर भागातील चिखल माती महामार्गावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. थोड्याशा पडलेल्या पावसाने  मोठ्या प्रमाणात महामार्ग चिखलमय झाला होता. तर जून महिन्यात बुधवारी दि. 19 ला  मुसळधार पडलेल्या पावसामध्ये वाकेड व आंजणारी घाटात भयानक अवस्था निर्माण झाली. वाकेड घाटीत तर मोरी खचल्याने रस्त्याला भगदाड पडले. वाहनचालकांच्या वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, दोन ते अडीच तास वाहतूक ठप्प पडली. भर पावसात वाहतुकीचा फार मोठा खोळंबा झाला.

लांजा शहराचा विचार करता सध्या शहरात उड्डाणपुलाच्या पिलरचे काम सुरू असल्याने साईडपट्टी व गटारे बुजवून पर्यायी मार्ग काढण्यात आल्याने शहरात पडणार्‍या पावसाचे पाणी जाणार कुठे, असा प्रश्न शहरातील व्यापारी व नागरिकांना पडला आहे. गटारे बुजविण्यात आल्याने शहरातील पावसाचे पाणी रस्त्यावरून गेल्यास रस्त्याची अवस्था खडतर होईल. गटारे नसल्याने पावसाचे पाणी शहरातील दुकानामध्ये जाऊन व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.