Sun, Jul 21, 2019 07:47होमपेज › Konkan › मुंबई-गोवा महामार्ग ठेकेदाराकडून मनमानी

मुंबई-गोवा महामार्ग ठेकेदाराकडून मनमानी

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 8:37PMकणकवली : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून या कामामुळे काही जणांचे अपघातात मृत्यू झाले आहेत. ठेकेदार काम करताना मनमानी करीत असून मंत्री आणि अधिकारी खिशात असल्याचे जनतेला भासवत आहेत. ठिकठिकाणी खोदाईमुळे सध्या असलेला महामार्ग वाहतुकीस धोकादायक झाला आहे. रस्त्याच्या कामाला वापरणारे  स्टील हे कोटेड स्टील असावे असे डीएसआर मध्ये नमूद असताना ते का वापरले नाही याचा खुलासा करावा, अशी मागणी मनसेचे नेते माजी आ. परशुराम उपरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच दर्जेदार रस्ता न झाल्यास जनहीत याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुख्य अभियंत्यांना दिलेल्या पत्रात परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्ग ज्या ज्या गावातून जात आहे, त्या त्या गावातील ग्रामपंचायतीत तेवढ्या भागाचा व तालुक्यातील तहसील कार्यालयात मुंबई-गोवा महामार्गाचा थ्रीडी नकाशा जनतेला पाहण्यासाठी ठेवावा. बर्‍याच गावातील जनतेमध्ये गावातून जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाबाबत गैरसमज निर्माण झाले आहेत. तो दूर करण्यासाठी वरील सूचना संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना द्याव्यात. ठेकेदार नदीतील गाळ काढून तो भरावाच्या कामाला वापरेल, त्यामुळे नदीच्या पात्रात  मुबलक पाणी उपलब्ध होईल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. मात्र, ठेकेदार गाळ उपसा न करता नदीपात्रातील पाण्याचा वापर केवळ कामासाठी करत आहे. त्यामुळे नळयोजनांच्या विहिरींचे स्त्रोत आटले असून गावांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ठेकेदाराला योग्य ती समज द्यावी. 

राज्य शासनाने सर्व कारभार मराठीतून करण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना ठेकेदाराने महामार्गावर लावलेले मार्गदर्शक सूचना फलक हे हिंदीतून आहेत. ते तातडीने मराठीतून करावेत. बर्‍याच ठिकाणी रस्त्याच्या कामामुळे महामार्ग उंच झाला आहे तर काही ठिकाणी तो सखलही झाला आहे. काही वळणे आहेत, काही ठिकाणी मातीचा भर टाकला आहे. सखल भागाच्या ठिकाणी किंवा पुलाच्या लगत तकलादू काठ्या उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यटक आणि वाहनचालकांना अपघात घडत आहेत.त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षेसाठी आवश्यक सक्षम उपाययोजना करावी, अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली आहे.