Tue, Jul 16, 2019 02:13होमपेज › Konkan › महामार्ग चौपदरीकरणाचा पहिल्याच पावसात पोलखोल!

महामार्ग चौपदरीकरणाचा पहिल्याच पावसात पोलखोल!

Published On: Jun 12 2018 12:52AM | Last Updated: Jun 11 2018 10:34PMकाेकण : सचिन राणे

कोकणच्या विकासाचा राजमार्ग असलेल्या मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या तथाकथित दर्जाचा पहिलाच पावसात पोलखोल झाला आहे.  महामार्गाच्या खारेपाटण ते कलमठ या टप्प्यात सर्वत्र खड्डे पडले असून  महामार्ग जागोजागी खचला आहे. सिंमेट कॉक्रिटने बनवलेला रस्ता ही तुटला असून काही ठिकाणी रस्त्यावरच भगदाडे पडल्याने हा महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनत आहे. अजून पावसाळी हंगामाचा संपूर्ण कालावधी जायचा आहे. पहिल्याच पावसात महामार्गाची ही दुर्दशा असेल तर चौपदरीकरणाच्या दर्जाबाबत शंका निर्माण होण्यास जागा आहे. महामार्ग प्राधिकरण विभाग याबाबत खुलासा करणार काय? असा सवाल वाहनचालक, प्रवासी तसेच जिल्हावासीयांचा आहे.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बनविण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या बाजूला बांधण्यात आलेली साईडपट्टीची कडा तुटली असून यामुळे पहिल्याच पावसात चौपदरीकरणाच्या निकृष्ट  कामाचा दर्जा समोर आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम चालू असल्याने खारेपाटण ते कलमठ दरम्यान ठिकठिकाणी सिमेंट काँक्रिटचा नवा झळाळी देणारा महामार्ग बनविण्यात आला आहे. सध्या पावसामुळे जुना रस्ता खोदाई केल्यामुळे नवीन सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावरून सध्या वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नवीन बनविण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याच्या साईटपट्टीचे  काम प्रगतीपथावर असताना पियाळी पुलानजीक साईडपट्टी ढासळत असल्याचे दिसते.

यावरून या कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण होत आहे. ढासळलेली साईडपट्टीची कडा धोकादायक ठरू शकते. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच महामार्गाचे काम सुरू असताना हायवे प्राधिकरण पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने अशाप्रकारे दर्जाहीन काम ठेकेदार करत आहे. यावर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी वाहन चालक व नागरिक करीत आहेत.