Thu, Jul 18, 2019 16:35होमपेज › Konkan › महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू

महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 10:34PM

बुकमार्क करा
 

नांदगाव : वार्ताहर

कोकणच्या विकासाचा राजमार्ग समजल्या जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामधील खारेपाटण संभाजीनगर ते कलमठ टप्प्याचे चौपदीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू झाले आहे. कासार्डे येथील माळरानावर एका लेनचे काम सुसाट चालू असल्याचे दिसत आहे. डिसेंबर 2018 पर्यंत महामार्ग तयार होणार, अशी घोषणा केंद्र व राज्य शासनांनी केली आहे. सध्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली असता पावसाचा व्यत्यय न आल्यास काम मोठ्या गतीने सुरू राहील, असे दिसत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांच्या कामासाठी भूसंपादन व जमीन हस्तांरण प्रक्रिया झाल्यानंतर कुडाळ येथे 23 जून 2017 रोजी नेते मंडळी व मान्यवरांच्या उपस्थितीत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाचा प्रारंभ करण्यात आला. ज्या भूसंपादन झालेल्या काही नागरिकांना त्याच्या खात्यांत पैसे जमाही झाले असून, काही प्रकरणे हरकतीमुळे प्रलंबित आहेत. सध्या संभाजीनगर ते कलमठ यामध्ये येणारी खारेपाटण, नडगिवे, वारगाव, साळीस्ते, तळेरे, कासार्डे, नांदगाव, बेळणे, हुंबरठ, जानवली व कलमठ या गावांमधून जाणार्‍या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून, प्रथम दर्शनी ज्या ठिकाणी जागा मोकळी आहे, अशा ठिकाणी रस्ता लेनची माती टाकून भराव घालणे व रस्त्यागत असणारी झाडे तोडण्याचे काम सध्या कासार्डे परिसरात दोन्ही बाजूंनी सुरू आहे.

चौपदरीकरणामुळे कोकणच्या सौंदर्यामध्ये भर पडणार असल्याने पर्यटकांचा ओघ वाढणार आहे, हे निश्‍चितच या रस्त्याच्या कामाची वैशिष्ट्ये म्हणजे काँक्रिट रस्ता 2 लेन पेव्हड शोल्डरसह, मोठे पूल, लहान पूल, साकव बांधण्यात येणार आहेत. यामुळे या मार्गावरील गावांचा विकास होणार आहे. काही मिनिटांच पोहोचता येणे शक्य होणार आहे.