Tue, Apr 23, 2019 09:33होमपेज › Konkan › मोजणी अधिकार्‍यांना राजापुरातील नागरिकांचा दणका

मोजणी अधिकार्‍यांना राजापुरातील नागरिकांचा दणका

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 8:54PM

बुकमार्क करा
राजापूर : प्रतिनिधी

मुंबई-गोवा  राष्ट्रीय महामार्ग चौपद रीकरणामध्ये जमीन जाणार्‍या जागा मालकांना कोणतीही माहिती न देता वा त्यांना विश्‍वासात न घेता जमिनीची मोजणी करणार्‍या अधिकार्‍यांना काही नागरिकांनी चांगलाच हिसका दाखवला. मोजणी करायला दिलीच नाही. मात्र, त्यांच्याकडील दफ्तर काढून घेत त्यांना माघारी पाठवले. त्यामुळे राजापूर शहरातील चौपदरीकरणाचा विषय चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

सध्या मुंबई -गोवा महामर्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला जोरात सुरूवात आहे. राजापूर शहरातून हा महामार्ग एस.टी.आगारासमोरून डावीकडे वळविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी काहीजणांना शासनाकडून नोटिसाही बजावण्यात आल्या. मात्र, या महामार्ग चौपदरीकरणामध्ये जागा जाणार्‍या अनेकांना नोटीसच मिळालेली नाही.

या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी दुपारी जमीन मोजणी करण्यासाठी काही अधिकारी राजापूर आगारासमोर आले. मात्र, याबाबतची माहिती मिळताच संबंधित जागा मालक तसेच गाळेधारक तेथे हजर झाले. सदर  महामार्ग स्वर्गीय मीनाताई ठाकरे व्यापारी संकुल असलेल्या इमारतीला घेऊन जाणार असल्याने येथील गाळेधारकांनी त्याला कडाडून विरोध केला. सदर इमारत राजापूर नगरपरिषदेच्या मालकीची असून येथील गाळेधारकांनी नगरपरिषदेशी 30 वर्षांचा करार केला आहे. यातील जेमतेम 10 वर्षे पूर्ण झाली असून अद्याप 20 वर्षांचा कालावधी शिल्‍लक आहे. त्यामुळे सदर इमारत जमीनदोस्त करून येथून महामार्ग निघाल्यास या गाळेधारकांचे काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला.

तसेच या गाळेधारकांसह संबंधित जमीन मालकांना नोटिसा मिळाल्या नसल्याने जमीन मोजणीला नागरिकांनी विरोध केला. सदरची मोजणी करण्यासाठी कृषी तसेच भूमिअभिलेख कार्यालयाचे कर्मचारी आले होते. मात्र, नागरिकांनी या मोजणीला विरोध करत त्यांचे दफ्तरच ताब्यात घेतले. संबंधित जबाबदार अधिकार्‍यांना बोलवा. नंतरच तुमचे दफ्तर देऊ, असा इशारा देण्यात आला. त्यामुळे जमीन मोजणी करण्यासाठी गेलेल्या अधिकार्‍यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. यावेळी नागरिकांमध्ये राजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष हनिफ काझी, नगरसेवक विनय गुरव, अनिल कुडाळी, माजी नगरसेवक रवींद्र बावधनकर, बंधू गुरव आदींचा समावेश होता.