होमपेज › Konkan › सागरी मोहिमेतून धाडसी वृत्तीला चालना

सागरी मोहिमेतून धाडसी वृत्तीला चालना

Published On: Jan 31 2018 12:00AM | Last Updated: Jan 30 2018 11:41PMरत्नागिरी : प्रतिनिधी

राष्ट्रीय एनसीसी मुख्यालय मुंबई व 2 महा. नेव्हल युनिट एनसीसी रत्नागिरीतर्फे नियोजित सागरी मोहिमेचा समारोप प्रजासत्ताक दिनी झाला. या मोहिमेंतर्गत 10 बंदरांच्या भेटीतून छात्र सैनिकांत पाण्यावरील साहस व धाडसी वृत्तीला चालना मिळाली.

या मोहिमेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर येथील निवडक 20 छात्रसैनिकांसह कोकण कृषी विद्यापीठाची ‘मत्स्यतरंगणी’ सेफ्टी बोट व दोन यांत्रिकी बोटी, 27 फुटांच्या दोन सीलिंग पुलर बोटी सहभागी झाल्या होत्या. रत्नागिरीतील भगवती बंदर येथून दि. 17 जानेवारीला या मोहिमेला प्रारंभ झाला. वरवडे, जयगड, बोर्‍या, पालशेत, दाभोळ, हर्णै, मुरुड, वेलदूर, तवसाळ आदी बंदरांना भेटी देऊन या मोहिमेचा समारोप पुन्हा भगवती बंदरात करण्यात आला.

या अंतर्गत छात्र सैनिकांनी सागरी किनारी वसलेल्या गावांतील शाळा, हायस्कूल, महाविद्यालयांत पथनाट्यातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. या दरम्यान सायकल मोहीम, पाण्यावरील धाडसी प्रात्यक्षिक आदींमध्येही त्यांनी सहभाग घेतला. मोहिमेचे प्रमुख कॅप्टन निळकंठ खौंड यांच्या हस्ते गावातील सरपंच आणि मान्यवरांना पाणबुडीचे प्रतिमान, भेटवस्तू तसेच विद्यार्थ्यांना नौसेना व संरक्षण दलात भरती होण्यासाठी आवश्यक माहितीपत्रके वाटण्यात आली. यासाठी पेटी ऑफिसर राहुल, कॅडेट कॅप्टन मंदार ढेकणे यांनी मेहनत घेतली. 

मोहिमेच्या सांगता समारंभात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या नेव्हल विभागाचे कॅडेटस ए. एन.ओ. यादव, सहट्रेनिंग ऑफिसर एन. एस. सागा यांनी सहभागी सर्व छात्रसैनिक, अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे कौतुक केले. सहभागी छात्रसैनिकांना ग्रुप कमांडर ब्रिगेडियर पी. एस. राणा व विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अ‍ॅड. मलुष्टे, आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम उपप्रमुख विद्वांस यांच्याहस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.