Mon, Jun 17, 2019 02:13होमपेज › Konkan › तलाठ्यासाठी आचरा ग्रामस्थ छेडणार आंदोलन

तलाठ्यासाठी आचरा ग्रामस्थ छेडणार आंदोलन

Published On: May 03 2018 1:29AM | Last Updated: May 02 2018 11:26PMआचरा : वार्ताहर

गेल्या वर्षभरापासून आचरा गावासाठी कायमस्वरूपी तलाठी नसल्याने शेतकरी, ग्रामस्थ व विद्यार्थी वर्गाला त्याचा फटका बसला असून त्याचे पडसाद आचरा ग्रामसभेत उमटले. आचरा गावाला दिलेला कामगिरीवरील तलाठी आठवड्यातून एक दिवस येतो असा ग्रामस्थांनी आरोप करत आचरा गावास कायमस्वरूपी तलाठी दिला नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा निर्धार ग्रामस्थांनी  ग्रामसभेत केला. आर्थिक वर्षातील पहिलीच ग्रामसभा वादळी ठरली. नव्याने सरपंचपदी विराजमान झालेल्या प्रणया टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली.  उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, माजी सरपंच व सदस्य मंगेश टेमकर, सदस्य लवू घाडी, रेश्मा कांबळी, वैशाली कदम, मुजफ्फर मुजावर, दिव्या आचरेकर, राजेश पडवळ, योगेश गावकर, ममता मिराशी, श्रध्दा नलावडे, वृषाली आचरेकर यांच्यासह माजी सरपंच चंदन पांगे, जि. प. सदस्य जेरोन फर्नांडिस, पं. स. सदस्य निधी मुणगेकर, जगदीश पांगे, नितीन घाडी, बबन सक्रू व ग्रामस्थ उपस्थित होते. 

मार्च 2017 पासून कायमस्वरूपी तलाठी नाहीच

आचरा गावात एकूण आठ महसूली भागांचा समावेश होतो. यात आचरा, पारावाडी, डोंगरे, गाउडवाडी, पिरावाडी, जामंडूल हिर्लेवाडी या भागांचा समावेश आहे. आचरा गाव क्षेत्रफळाने मोठा आहे. या गावासाठी गेले वर्षभर स्वतंंत्र  तलाठी नाही. परिणामी नागरिकांना वेगवेगळ्या दाखल्यांसाठी तलाठ्याची 15 दिवस वाट पहावी लागत आहे. सातबारा वेळेत मिळतच नाही, उत्पन्नाचे दाखले मिळत नाहीत. वारसांच्या नोंदीही वेळेत होत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

कामगिरीवरील तलाठ्यांवर ग्रामस्थांचा आरोप

ग्रामसभेत तलाठी मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले. तलाठी नसल्याने उद्भवणार्‍या परिस्थितीचा पाढाच ग्रामस्थांनी वाचला. यावेळी महिलावर्गानेही आक्रमकपणेआपल्या व्यथा ग्रामसभेसमोर मांडल्या. मार्च 2017 पासून कायमस्वरूपी तलाठीच नाही. ज्या तलाठ्याकडे आचरा गावचा चार्ज आहे. त्याला आचरा गावासाठी गुरूवार हा वार दिला आहे. मात्र त्या तलाठ्यास ग्रामस्थांच्या कामात  स्वारस्य नसून वाळूवाल्यांची सेवा करण्यात  ते मग्‍न असतात, आचरा कार्यालयात ते 2 तासही हजर राहत नाही. कारण विचारले असता कामासाठी ओरोसला जावे लागत असल्याची उत्तरे दिली जातात. तलाठी बघावे तेव्हा वाळूचे डंपर अडवण्यात मग्‍न असल्याचा आरोप  ग्रामसभेत ग्रामस्थांनी केला. जून महिन्यात शिक्षणासाठी दाखल्यांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत जर आचरा तलाठी कायमस्वरूपी नसल्यास मुलांनाही त्रास सहन करावा लागणार आहे. येत्या काही दिवसात आचरा गावास तलाठी उपलब्ध  झाला नाही तर उग्र आंदोलन छेडू, असा महसूल विभागाला इशारा आचरा ग्रामसभेत ग्रामस्थांनी दिला आहे. 

Tags : Konkan, Movement, villagers, against, Talathi