Tue, Apr 23, 2019 21:36होमपेज › Konkan › रेशन दुकानदारांचे आजपासून आंदोलन

रेशन दुकानदारांचे आजपासून आंदोलन

Published On: May 04 2018 10:35PM | Last Updated: May 04 2018 10:33PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

धान्य वितरणाबरोबरच धान्य वितरण प्रणालीत कार्यान्वित करण्यात आलेली पॉस यंत्रणा सुरळीत करावी, या प्रमुख मागणीसाठी  जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी धान्य उचल बंद करण्याचा इशारा दिला आहे.  हे आंदोलन 1 मेपासून करण्यात येणार होते. मात्र, आता  या आंदोलनाची सुरुवात 5 मेपासून होणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. 

जिल्ह्यात धान्य दुकानांमध्ये पॉस (पॉईंट ऑफ सेल) मशीनद्वारे धान्य वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात 100 टक्के दुकानातून ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. शिधावाटप दुकानांमधून धान्याचे वाटप करताना ग्राहकांचे बायोमेट्रिक ठसे बंधनकारक करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत सातत्याने तांत्रिक दोष निर्माण होत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. यामुळे ग्राहकांचा रोष वाढल्याचा दावा केला जात आहे. ही यंत्रणा दोषमुक्त केली जावी आणि त्यानंतरच अशा स्वरूपाची सक्ती करावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. 

शिधा वाटपासाठी बायोमेट्रिकची सक्ती करत शिधापत्रिका आधारकार्डशी संलग्न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच शिधावाटपासाठी रेशन दुकानदारांना ई-पॉस यंत्रही देण्यात आली आहेत. मात्र, या बायोमेट्रिक प्रणालीमध्ये अनेकांच्या अंगठ्याचे ठसे जुळत नसल्याने धान्य वाटपात अडचणी निर्माण होत आहेत. अंगठ्याचे ठसे जुळत नसलेल्या व्यक्तीला धान्य दिले जात नाही. त्यामुळे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद निर्माण होऊ लागले आहेत.  याचा रोष ठेवून रेशन दुकानदारांना बदनाम करण्याचे प्रकार घडू लागले आहेत. अनेक शिधापत्रिकाधारकांची कागदपत्रे घेऊन ती शासनाकडे सादर केल्यानंतरही चुकीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांना धान्यापासून वंचित राहावे लागते आहे. ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत ग्राहकांना बायोमेट्रिक सक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. 

याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास रेशन दुकानांवर धान्य वितरण बंद करण्यात येईल. तसेच शिधा वाटपासाठी देण्यात आलेली ई-पॉस यंत्र एकत्रित जमा करून ती पुरवठा विभागाला परत देण्याचा निर्णय संघटनेने घेेतला आहे. त्यानुसार 5 मेपासून हे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.