Tue, Apr 23, 2019 02:32होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात बंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी

सिंधुदुर्गात बंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 11:13PMसिंधुदुर्ग : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी सकल मराठा समाजाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा बंद आंदोलन छेडण्यात आले. मराठा बांधवांनी जिल्हाभरात रास्ता रोको करत हे आंदोलन छेडले. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा तसेच रिक्षा व एस.टी. वाहतूक बंद होती. सर्व शहरांमधील शाळा, महाविद्यालये बंद होती. काही ठिकाणी एस.टी. बसेसवर दगडफेक व आंदोलकांवर लाठीचार्ज झाला.राष्ट्रीय महामार्गासह अन्य राज्यमार्ग व ग्रामीण मार्गांवर टायर पेटवून व झाडे पाडून रास्ता रोको करण्यात आला. काही ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यांवर ठिय्या मारला.

कुडाळ, वेंगुर्ले व कणकवली तालुक्यांत एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. एक चालक जखमी झाला. कुडाळ-साळगाव येथे एका युवकावर लाठीचार्ज झाल्याने आंदोलक आक्रमक झाले. वेंगुर्ले-आडेली येथे आंदोलन करणार्‍या सहा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कसाल येथे एका पोलिस अधिकार्‍याने आंदोलक व समाजबांधवांबद्दल अनुद‍्गार काढल्याने पोलिस व आंदोलकांमध्ये वादावादी झाली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामुळे कसाल व सिंधुदुर्गनगरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

देवगड-तळेबाजार येथे मराठा बांधवांनी मुंडन करून शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध केला. कणकवली-फोंडाघाट येथे एका एसटीवर दगडफेक झाली. तर कणकवली-वागदे येथे महामार्गावर पर्यटकांच्या गाड्या रोखून धरल्या. या आंदोलनामुळे गुरुवारी दिवसभरात एकही एसटी जिल्ह्यातून धावली नाही.