होमपेज › Konkan › आंबा कॅनिंगचा दर स्थिर न राहिल्यास आंदोलन

आंबा कॅनिंगचा दर स्थिर न राहिल्यास आंदोलन

Published On: May 19 2018 10:55PM | Last Updated: May 19 2018 9:49PMवेंगुर्ले : प्रतिनिधी 

सातत्याने घटत असलेला आंबा कॅनिंगचा दर येत्या 1 दिवसात  हंगाम संपेपर्यंत 22 ते 25 रु. एवढा स्थिर न राहिल्यास आंबा बागायतदार शेतकरी व स्वाभिमान पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडू,असा इशारा स्वाभिमानचे  तालुकाध्यक्ष मनीष दळवी व आंबा बागायतदार शेतकरी यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. अवकाळी पाऊस व हवामानामुळे आंबा बागायतदार शेतकरी यांना उर्वरित आंबा कॅनिंगला देण्याशिवाय पर्याय उरला नाही. याचाच गैरफायदा आंबा प्रक्रिया कंपन्या घेत असून सातत्याने दर घटवत आहेत.

सुरुवातीला 29 रु. प्रति किलो असा दर असताना आता हाच दर 16.50 रु. एवढा झाल्याने हा आंबा कवडीमोल दराने विकत घेतला जात आहे. अगोदरच पाऊस व हवामानामुळे आंब्याचे नुकसान व त्यात हा कॅनिंगचा दर कमी होत असल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या आंबा प्रक्रिया कंपन्या आपल्या फायद्यासाठी शेतकर्‍यांना लुबाडत असतील तर आम्ही आंबा बागायतदार शेतकरी व स्वाभिमान पक्ष गप्प बसणार नाही. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेत येत्या एका दिवसात याबाबत ठोस पाऊल उचलावे अशा आशयाचे निवेदन वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी यांना आंबा बागायतदार शेतकरी व स्वाभिमान पक्षाच्या वतीने देण्यात आले. आंबा बागायतदार नितीन कुबल, परबवाडा सरपंच पपू परब, भूषण आंगचेकर, मकरंद प्रभू, नितीन चव्हाण, बाबुराव परब, केदार आंगचेकर, मारुती दौडशानट्टी आदी उपस्थित होते.