Thu, Jul 18, 2019 16:57होमपेज › Konkan › सावंतवाडीत 27 पासून ‘मोती तलाव उत्सव’

सावंतवाडीत 27 पासून ‘मोती तलाव उत्सव’

Published On: Apr 24 2018 11:17PM | Last Updated: Apr 24 2018 11:04PMसावंतवाडी ः प्रतिनिधी

सावंतवाडी नगरपालिका व सजग नागरीक मंचच्या वतीने दरवर्षी 27 ते 30 एप्रिल या कालावधीत शाश्‍वत जीवनशैलीचा ‘मोती तलाव उत्सव’ आयोजित करण्यात येतो. देशभरातील पर्यावरणपूरक जीवनशैली जपणार्‍या व्यक्‍तींचा या उत्सवात सहभाग होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

उपनगराध्यक्षा सौ. अन्‍नपूर्णा कोरगावकर, सभापती सुरेंद्र बांदेकर, माधुरी वाडकर, सौ. भारती मोरे, बाबू कुडतरकर, आनारोजीन लोबो, प्रशांत भाट, अद्वैत नेवगी, सचिन देसाई, सरोज दाभोलकर, दिलीप धोपेश्‍वरकर, अ‍ॅड. सुहास सावंत, राजू बेग आदी उपस्थित होते. 

या महोत्सवाचे उद्घाटन नागरिक बाबू इनामदार यांच्या हस्ते होणार आहे. 30 एप्रिल रोजी पाणथळ जागेच्या संवर्धनासाठी चर्चासत्र  होणार आहे. यावेळी गोवा, कर्नाटक येथील मंडळे भेट देणार आहेत. या फेस्टिव्हलचे हे चौथे वर्ष आहे. दुर्लक्षित फळे, फुले तसेच वनस्पतींवर लक्ष केंद्रीत करणे, आपल्या पारंपारीक कला कौशल्यांचे जतन करणे, गावातील होतकरु महिला व शेतकरी यांना दुर्लक्षित फळे-फुले यांपासून नाविन्यपूर्ण उत्पादने  समाजापुढे सादर करण्याची संधी देणे, पारंपारीक आणि स्थानिक वाणाच्या भाज्या, बियाणे, फळे, फुले याद्वारे निर्मित उत्पादनांचे प्रदर्शन, विक्री व प्रबोधन करणे, हरीत व्यावसायिक व हरीत ग्राहक किंवा उपभोक्त्यांची संख्या वाढविणे हा या उत्सवाचा उद्देश आहे. 

यावर्षी जिल्ह्याबरोबरच देशाच्या विविध भागातील उत्पादकांचे स्टॉल या फेस्टिव्हलमध्ये लावण्यात येणार आहेत. कर्नाटक राज्याचा मास्टर क्राफ्टसमन पुरस्कारप्राप्त तसेच हरीयाणा राज्य कलाश्री पुरस्कार प्राप्त कर्नाटकातील के. केंचय्या यांचा लाखेचा वापरुन लाकडी वस्तू निर्मितीचा स्टॉल व त्यांचे प्रात्यक्षिक असणार आहे. 

रोमानियाला निर्यात होणार्‍या हस्त निर्मित सुती पर्सचा बेळगावमधील महिलांचा ‘दारोजी फॅब्रिक’ स्टॉल, वेगवेगळ्या प्रकारचे मध विक्रीसाठी मुंबईमधून व्यक्‍ती येणार आहेत. कोल्हापूरच्या पारंपरीक घोंगडीवाल्याचा स्टॉल, आयुर्वेदीक औषधांचा दापोली येथील निर्मिती स्टॉल, पारंपारीक पौष्टीक पदार्थांची कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा महिला गट यांचा स्टॉल, काश्मिर राज्यातून सेंद्रिय अक्रोड व केशर विक्रीचा स्टॉल व त्याचे प्रशिक्षण, चरखा महिला सहकारी संस्था यांचा खादी - उत्पादनाचा स्टॉल, पिकांच्या गावरान वाणांचे संवर्धन करणारी बायफ संस्था, पुणे यांचा स्टॉल असणार आहे. कृषी विज्ञान केंद्र, वेंगुर्ले फळ संशोधन केंद्र, स्टोन पेंटींग, अजित परब यांचे कंपोस्ट कल्चर कचर्‍याचे व्यवस्थापन आपणच करा  सांगणारा स्टॉल, वेंंगुर्ले तालुक्यातील कांदळवनांची सफर घडवून आणणार्‍या  महिलांचा स्वामिनी महिला गट यांचा कांदळवनांचा वापर करुन तयार केलेल्या पदार्थांचा स्टॉल, युवा हरीत व्यावसायिक अद्वैत नेवगी यांचा फणस, बेलफळ आदी दुर्लक्षित फळांचे नाविन्यपूर्ण आईसक्रीमचा स्टॉल तसेच जास्वंद, बेलफळ आदी फळांचे गुणकारी सरबतचा स्टॉल, कोकणची ओळख सांगणारे शिरवाळे यासारखे पदार्थांचे स्टॉल खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. याचबरोबर सावंतवाडीतील ईश प्रेमालया - कॅन्सर हॉस्पिटलच्या सिस्टरचा कॅन्सरविषयी जागृती करणारा स्टॉल  असणार आहे.