Sat, Dec 07, 2019 15:18होमपेज › Konkan › ...लेकराच्या घराजवळच आढळला मातेचा मृतदेह

...लेकराच्या घराजवळच आढळला मातेचा मृतदेह

Published On: Jul 07 2019 1:30AM | Last Updated: Jul 06 2019 9:49PM
चिपळूण : खास प्रतिनिधी

आई ही आईच असते. आपल्या मुलांप्रति तिची कायमच ओढ असते. याचा प्रत्यय गुरुवारी (दि.4) पेठमाप येथे आला. तिवरेतील दुर्घटनेत वाहून गेलेल्या ऋतुजा चव्हाण व रणजित चव्हाण या पती-पत्नीचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळला. मात्र, ऋतुजा यांचा मृतदेह 35 कि. मी. वाहत जाऊन आपला मुलगा राहत असणार्‍या घराजवळ पेठमाप येथे आढळला.

https://www.cricketworldcup.com/video/1265910/cwc19-mahendra-singh-dhoni-s-legacy

मंगळवारी रात्री तिवरे धरण फुटून दुर्घटना घडली. यामध्ये 23 ग्रामस्थ वाहून गेल्याने खळबळ उडाली. शोधकार्य सुरू झाले. संपूर्ण जिल्हा हादरला. अनेकांचे संसार कायमचे उद्ध्वस्त झाले. काही माणसे वाचली मात्र राहायला घरच उरले नाही. अशी भयावह परिस्थिती असताना बुधवारी सकाळी एक-एक मृतदेह सापडू लागले. या दुर्घटनेत चव्हाण कुटुंब पूर्णत: उद्ध्वस्त झाले. 

या एकाच कुटुंबातील सोळा व्यक्‍तींना जलसमाधी मिळाली. यामध्ये ऋतुजा रणजित चव्हाण (25), रणजित अनंत चव्हाण (35) व त्यांची चिमुकली दुर्वा यांचा समावेश होता. या पती-पत्नीचे मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आले. पती रणजित यांचा मृतदेह दादर येथील रामवरदायिनी मंदिरालगत असणार्‍या नदीमध्ये आढळला तर पत्नी ऋतुजा यांचा मृतदेह 35 कि.मी. दूरवर पेठमाप येथे तरंगताना आढळला.

तिवरे नदीतून वाहत हा मृतदेह वाशिष्ठी नदीला मिळाला आणि तो थेट पेठमापपर्यंत पोहोचला व फरशी येथे सापडला. ऋतुजा यांचा मुलगा रूद्र हा त्याचा पेठमाप येथील मामा संतोष माने यांच्याकडे रहायला होता. त्यामुळे रुद्र हा या दुर्घटनेतून वाचला आहे. तो तीन वर्षांचा असून या ठिकाणी त्याला शिक्षणासाठी ठेवण्यात आले होते.

या दुर्घटनेत रूद्रचे मातृ-पितृ छत्र हरपले असून चिमुकली दुर्वा देखील त्याला सोडून गेली आहे. आता या रूद्रची जबाबदारी मामावरच येऊन पडली असून रूद्रच्या अखेरच्या भेटीसाठी जणू त्याची माता पाण्यातून पेठमापपर्यंत आली असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. 

आई ऋतुजा यांचा मृतदेह नदीबाहेर काढून रुग्णवाहिकेतून कामथे रुग्णालयात पाठविण्यात आला. मामाच्या पेठमाप येथील घराजवळच हा मृतदेह सापडल्याने मोरे कुटुंबियांसह चव्हाण कुटुंबीय शोक व्यक्‍त करीत आहेत. या घटनेने संपूर्ण चव्हाण कुटुंबीयांच्या नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.