होमपेज › Konkan › मोर्वेत लवकरच पंचतारांकित हॉटेल

मोर्वेत लवकरच पंचतारांकित हॉटेल

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 02 2018 10:42PMदेवगड ः प्रतिनिधी

देवगड तालुक्यामधील हिंदळे-मोर्वे येथील 170 एकर मधील क्लब महिंद्रातर्फे फाईव्ह स्टार हॉटेल उभारले जाणार असून याचे भूमिपूजन 15 जुलै रोजी होणार आहे. यामुळे देवगडच्या अर्थकारणामध्ये भर होऊन परदेशी पर्यटकही आता देवगडमध्ये आकर्षित होतील, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये आ. नितेश राणे यांनी दिली.

देवगड येथील स्वाभिमान कार्यालयामध्ये आ. नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी देवगड-जामसंडे नगरध्यक्ष योगेश चांदोस्कर, उपनगराध्यक्ष संजय तारकर, तालुकाध्यक्ष डॉ.अमोल तेली, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश राणे, आरिफ बगदादी, प्रियांका साळसकर, उमेश कणेरकर, बाळा खडपे आदी उपस्थित होते.
आ. नितेश राणे म्हणाले,पर्यटन विकासाच्या माध्यमातून आपण देवगडमध्ये अनेक विकासकामे करीत असतेवेळी विदेशी पर्यटक देवगडमध्ये वास्तव्यास राहण्यासाठी याठिकाणी फाईव्हस्टार हॉटेलची गरज होती. ही समस्या जाणून आपण महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांची भेट घेऊन देवगडमध्ये फाईव्हस्टार हॉटेल होण्यासाठी मागणी केली होती.

या मागणीला प्रतिसाद देऊन याठिकाणी फाईव्हस्टार हॉटेल उभारण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. या फाईव्हस्टार हॉटेलचे उद्घाटन 15 जुलै रोजी होणार आहे. या हॉटेलसाठी हिंदळे-मोर्वे येथील समुद्रकिनारी 170 एकर जमीनही महिंद्रा कंपनीने यापूर्वीच घेतली आहे. या फाईव्हस्टार हॉटेलमुळे देवगडचा चेहरामोहरा बदलून अनेक देशी-विदेशी पर्यटकांचा ओघ देवगडकडे वाढू लागणार आहे. यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. अनेक देशी-विदेशी पर्यटक गोव्याकडे जात असताना व त्या ठिकाणी वास्तव्य करीत असताना आपण पाहिले आहे. कारण त्या ठिकाणी फाईव्हस्टार हॉटेलची सुविधा होती.आता देवगडमध्येही अशा हॉटेलची सुविधा निर्माण झाल्यानंतर हजारो पर्यटक देवगडकडे दाखल होउन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होउन हा प्रकल्प देवगडचे अर्थकारणच बदलुन टाकणार आहे.

देवगडमध्ये पर्यटन विकासाच्या माध्यमातून वॅक्स म्युझियम,स्कुबा डायव्हिंग,कंटेनर थिएटर अशा सुविधा आपण निर्माण केल्या आहेत. क्लब महिंद्रातर्फे  हिंदळे-मोर्वे येथे 170 एकरमध्ये होणारे फाईव्हस्टार हॉटेल दिड ते दोन वर्षामध्ये पुर्ण होणार आहे.जगामध्ये क्लबमहिंद्रा रिसॉर्ट तर्फे अशी हॉटेल्स पन्नास बांधली आहेत. तश्याच स्वरुपाचे जागतिक दर्जाचे दर्जेदार असलेले फाईव्हस्टार हॉटेल देवगड येथील हिंदळे-मोर्वे येथे साकारले जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये आमदार नितेश राणे यांनी दिली.