Sat, Jul 20, 2019 10:55होमपेज › Konkan › ग्रीन रिफायनरीविरोधात गिर्ये-रामेश्‍वरवासीयांचाही एल्गार!

ग्रीन रिफायनरीविरोधात गिर्ये-रामेश्‍वरवासीयांचाही एल्गार!

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 09 2017 10:15PM

बुकमार्क करा

विजयदुर्ग : वार्ताहर

ग्रीन रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होवू देणार नाही, असा पवित्रा घेत गिर्ये - रामेश्‍वरवासीयांनी रिफायनरी प्रकल्पाविरोधात एल्गार केला.सर्वांनी एकत्रित येवून संघर्ष करून औष्णिक प्रकल्पा प्रमाणेच हा प्रकल्प हद्दपार करा ,असे आवाहन कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोकदादा वालम यांनी केले. रिफायनरी तसेच रामेश्‍वर- गिर्ये भागात होत असलेल्या भूसंपादन प्रक्रियेबाबत   विरोधासाठी शनिवारी तेथील श्रीदेव रामेश्‍वर मंदिरात सभेचे आयोजन करण्यात आले होते. असंख्य ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते.

योगेश नाटेकर,प्रमुख मार्गदर्शक व कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष  अशोकदादा वालम, उष्णता व बदल अभ्यासक राजेंद्र फातारफेरकर, विक्रांत कर्णिक, नाणार समिती सचिव भाई सावंत, रामेश्‍वर सरपंच सौ.नलिनी गिरकर, जि.प.सदस्या सौ.वर्षा पवार, रामेश्‍वर प्रकल्प विरोधी अध्यक्ष सुरेश केळकर, गिर्ये अध्यक्ष मुनाफ ठाकुर, पंढरीनाथ आंबेरकर, वसंत बांदकर, नंदकुमार कुलकर्णी (वकील), नाणार विरोधी अध्यक्ष अमित भाटकर, उदय पुजारे, प्रवीण पवार, स्वाती मसुरकर आदी उपस्थित होते.

अशोक  वालम म्हणाले, रिफायनरी विरोधात सर्वांनी एकजूट करून लढा द्या. कोणत्याही नेत्याचा आश्रय न घेता स्वत:च नेता बना.आजपर्यंत कोकणात शेतकर्‍यांने कधीही आत्महत्या केलेली नाही.परंतू आता हा विनाशकारी प्रकल्प आणून आम्हाला आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे.

नाणार भागातील जमिन दलालांना आम्ही जागेवर आणले आहे. आता रामेश्‍वर भागातील जमिन दलालांना देखील त्याच पध्दतीने जागेवर आणा. हा प्रकल्प विनाशकारी असून कोणत्याही आश्‍वासंनाना बळी पडू नका. कोणत्याही  परिस्थितीत हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, कोकणातील असलेली परंपरा,येथील शेत जमीन, देवळे, वडिलोपार्जित असलेली आपली जमिन याचे रक्षण करा, असे आवाहन त्यांनी  केले.

यावेळी गिर्ये रामेश्‍वर भागातील नागरिकांनी एकजुटीने या प्रकल्पाला विरोध करून भुसंपादन प्रक्रिया होवू देणार नाही, असा पवित्रा घेतला यामुळे राजापुरप्रमाणेच गिर्ये रामेश्‍वर या भागातील जनता या प्रकल्पाविरोधात उतरली आहे.