Mon, Aug 19, 2019 11:34होमपेज › Konkan › ...तर महिला आरक्षण हवेच कशाला!

...तर महिला आरक्षण हवेच कशाला!

Published On: Aug 30 2018 1:19AM | Last Updated: Aug 29 2018 10:42PMकुडाळ : प्रतिनिधी 

पिंगुळी ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंचांना झेंडावंदन करण्यापासून उपसरपंचांनी डावलल्याचा आरोप कुडाळ सरपंच सेवा संघाने करून जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार केली. याबाबत प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरू असतानाच पंचायत समितीच्या मासिक बैठकीत हा विषय शिवसेना सदस्यांनी चर्चेत आणला. अशाप्रकारे महिलांचा अधिकार हिरावून घेतला जात असेल तर सरकारचे महिला आरक्षण हवेच कशाला? अशा संतप्त भावना शिवसेनेच्या  महिला सदस्यांनी सभागृहात व्यक्‍त केल्या. 

कुडाळ पंचायत समितीची मासिक बैठक सभापती राजन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  उपसभापती श्रेया परब, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई आदींसह  सदस्य व विभागप्रमुख, प्रतिनिधी उपस्थित होते.     

15 ऑगस्टला पिंगुळी ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंचाना झेंडावंदन का करू दिले नाही? असा सवाल सदस्य जयभारत पालव यांनी उपस्थित केला. यावेळी शिवसेनेच्या प्राजक्‍ता प्रभू, शरयू घाडी व शीतल कल्याणकर यांनी विस्तारअधिकारी आर.डी.जंगलेे यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला. अखेर गटविकास अधिकारी चव्हाण यांनी याबाबतची तक्रार आली असून चौकशी सुरू आहे. ग्रामसेवक त्या झेंडावंदन कार्यक्रमास उपस्थित नव्हते. येत्या चार दिवसात याबाबतचा परिपूर्ण अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविला जाईल. चौकशी सुरू असल्याने याबाबत आताच काही बोलणे उचित ठरणार नाही, असे सांगितल्याने या वादावर तूर्त पडदा पडला.

तालुक्यातील पेपरलेस ग्रामपंचायतीचा गुणगौरव कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर सभापतींची सही का नव्हती? हा तर सभागृह व सभापतींचा अपमान असल्याचा आरोप शीतल कल्याणकर यांनी केला. यावेळी सौ. प्राजक्‍ता प्रभू, शरयू घाडी यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. अखेर गटविकास अधिकारी चव्हाण यांनी प्रशासनाच्यावतीने आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, या कार्यक्रमाबाबत सभापतींना कल्पना दिली होती. त्यांना कार्यक्रमस्थळी येण्यास उशीर झाला. परिणामी प्रायोगिक तत्वावर सीईओंच्या हस्ते तो गौरवण्याचा कार्यक्रम घेण्यात आला असल्याचेे सांगितले.  सभापती राजन जाधव यांनी मात्र बोलण्याचे टाळून आपल्याच सदस्यांना तोंडघशी पाडल्याचे दिसून आले. 

आंब्रड गावातील वायरमन प्रश्‍नी अरविंद परब यांनी लक्ष वेधत महावितरणच्या कारभाराबाबत संताप व्यक्‍त केला. बाळकृष्ण मडव, सुप्रिया वालावलकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. रस्त्यांवरील खड्ड्यांप्रश्‍नी सर्वच सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. शासकीय जमिनीवर जी घरे आहेत ती नियमित करणे यासाठी तालुकास्तरावर समिती गठीत केली आहे. त्या समितीकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे नमुना नं. 8 च्या नोंदवहीच्या प्रती आपले सरकार सेवा केंद्राच्या केंद्रचालकामार्फत ऑनलाईनप्रमाणे कराव्या व नोंदवही गटविकास अधिकारी यांच्याकडे द्यावी असे विस्तार अधिकारी जंगले यांनी सांगितले. वालावल पूर्व शाळेला तीन वर्षे गळती लागली याकडे प्राजक्‍ता प्रभू यांनी लक्ष वेधले. यावेळी कौस्तुभ राणे, गुरूदास कामत, अजित वाडेकर, एम. करूणानिधी आदींना श्रध्दांजली वाहण्यात आली.