Thu, Apr 25, 2019 03:51होमपेज › Konkan › मान्सून आज सिंधुदुर्गात

मान्सून आज सिंधुदुर्गात

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 07 2018 10:27PMसिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी

मान्सून अखेर महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांच्या सीमेवर दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. शुक्रवारी मान्सून सिंधुदुर्गात दाखल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.अरबी समुद्रातही पोषक परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे 11 जूनपर्यंत अतिवृष्टी होईल, असाही इशारा हवामान खात्याने दिला आहे.

5 जून रोजी खरेतर मान्सूनचे आगमन कोकणात होणे अपेक्षित होते. परंतु, नेहमीच्या मुहूर्तावर म्हणजे मृग नक्षत्र दिनी मान्सून कोकणात हजेरी लावणार आहे. गुरुवारी गोव्यात फारसा पाऊस नसला तरी नैॠत्य मोसमी वारे गोव्यापर्यंत धडकल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. गेले सहा दिवस केरळ आणि कर्नाटकात पाऊस सुरू आहे. गोव्यातही गेल्या काही दिवसांत मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्येही वादळ वार्‍यासहीत विजांच्या गडगडाटासह पावसाच्या अनेक सरी कोसळल्या. त्यामुळे नळयोजनांना पाणीपुरवठा करणार्‍या विहिरी पाण्याने भरल्यामुळे पाणीटंचाई काही प्रमाणात दूर झाली आहे. शुक्रवारी मृग नक्षत्राचा मुहूर्त साधत धो-धो पाऊस कोसळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

भारतीय हवामान खात्याने 11 जूनपर्यंत कोकणात अतिवृष्टी होईल, असा इशारा दिला आहे. 15 जूनपासून प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होत असल्याने या अतिवृष्टीची चिंता शाळकरी मुलांना असली तरी नुकत्याच भातपेरणीसाठी बाहेर पडणार्‍या शेतकर्‍यांना आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने या अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. एवढेच नव्हे तर शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असाही सल्ला दिला आहे.