Sun, Sep 23, 2018 06:40होमपेज › Konkan › अन् माकडांनी केला रास्ता रोको

अन् माकडांनी केला रास्ता रोको

Published On: Feb 10 2018 1:32AM | Last Updated: Feb 09 2018 10:41PMमालवण : प्रतिनिधी 

मालवण शहरातील कन्याशाळा मार्गावर शुक्रवारी सकाळी वाहनाच्या धडकेत एका लहान माकडाचा मृत्यू झाला. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या त्या मृत माकडाच्या बाजूला अन्य माकडे गोळा झाली. जणू काही त्या मृत माकडाचा जाब विचारण्याच्या स्थितीत असलेल्या माकडांना पाहून रास्ता रोकोचे चित्र दिसून आले होते. 

दरम्यान, काही वेळाने इतर माकडे दूर झाली मात्र एक माकडीन आजूबाजूला फिरत होती. कोणालाही त्या मृत माकडाच्या जवळ येवू देत नव्हती. त्या माकडीनींचेच ते मृत पिल्लू असल्याचा अंदाज काही उपस्थितांनी वर्तवला.  प्राण्यांमधील एकोपा व स्नेह पाहून काहींच्या डोळ्यातून यावेळी अश्रू ओघळले.

सुमारे तासभर सुरू असलेल्या या घटनेची माहिती नगरसेवक यतीन खोत यांनी पालिका व पोलिस प्रशासनास दिली. 

त्या दरम्यान रस्त्यावरून जाणार्‍या पादचार्‍यात काहीसे भीतीचे वातावरण होते. काहींनी रस्त्यावरील मृत माकड बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र माकडीन अंगावर धावून येत होती. 

पालिकेचे स्वच्छता मुकादम रमेश कोकरे कर्मचार्‍यांसोबत घटनास्थळी पोहचले. मृत माकडाला कचरा गाडीत टाकण्यात आले. यावेळी त्या माकडीणीने कोकरे यांच्या दिशेने चाल केली. मात्र कर्मचार्‍यांनी तिला पळवून लावले. तरीही काही काळ माकडीणीने मृत माकड असलेल्या कचरा गाडीचा पाठलाग केला. सुमारे तासभर चाललेल्या या संपूर्ण प्रकाराची चर्चा मालवण शहरात सुरू होती.