Sat, May 30, 2020 04:48होमपेज › Konkan › कुडाळ तालुक्यात माकडांचा हैदोस!

कुडाळ तालुक्यात माकडांचा हैदोस!

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 8:34PMपणदूर  : प्रकाश चव्हाण

अपार मेहनत घेऊन घडवलेल्या व जीवापाड जतन-संवर्धन केलेल्या माड बागायती माकडांमुळे फळाविना ओस पडल्याने कुडाळ तालुक्यातील माड बागायतदार शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. हजारो रूपये खर्च करून उभ्या केलेल्या 10-15 वर्षाच्या बागांतूनही मिळणारे उत्पन्न खर्चाच्या तुलनेत शुन्य आहे. घावनळे सारख्या भागात 400-500 झाडे असलेल्या शेतकर्‍यांवर नारळ विकत घेण्याची पाळी आली आहे. डिगस सारख्या डोंगराळ नसलेल्या भागातील बागायतींतूनही माकडांचा स्वैर वावर बागमालकांना डोकेदुखी ठरत आहे.माकडांच्या त्रासाला कंटाळून काहींनी आपल्या बागा बुलडोजरने उखडून टाकल्या आहेत. वनविभागही माकडांच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताबाबत हतबल झाले आहे. काही गावात माकड नुकसानभरपाई दहा वर्ष मिळालेलीच नाही.काहींना तर अशी नुकसानभरपाई  मिळते याची माहिती देखील नसल्याची स्थिती कुडाळ तालुक्यातील अनेक गावात दिसत आहे.

माकडांनी केल्या बागा उजाड

तालुक्यात बामणादेवी व लगतच्या वाड्या तसेच निवजेच्या काही वाड्यावरील शेकडो माडबागा माकडांच्या हैदोसामुळे उध्वस्थ झाल्या आहेत. 10-15 वर्षाच्या व त्याहूनही जून्या बागांमध्ये झाडे फळांनी लगडलेले न दिसता पूर्णपणे उजाड झालेली दिसून येत आहेत.घावनळे बामणादेवी भागात जगन्नाथ तेलींची 150-200 झाडांची बाग आहे. डोंगर उतारावरची अगदी वस्तीतही ही बाग माकडांमुळे अक्षरशः ओस पडली आहे.त्यामुळे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाले आहे.

माकडे हाकलण्यासाठी मजूर

घावनळे माजी सरपंच संतोष मुंज यांची देखील 500 ते 550 झाडांची माड बागायत असून माकडांमुळे संकटात आल्याचे ते सांगतात.50 ते 60 माकडांची झुंड बागेत हैदोस घालताना पिटाळायचे तरी कोणाला व कसे? असे ते सांगतात.माकडे हाकविण्यासाठी मजुरांवर आपणाला खर्च करावा लागतो. असे मुंज यांनी सांगितले.घावनळे, निवजे, तुळसूली, पावशी, डिगस आदी भागातील अनेक शेतकर्‍यांच्या मोठ-मोठ्या बागा माकडांच्या त्रासाला बळी पडल्याचे दिसत आहे. 

बुलडोजरने बाग उखडली

घावनळेत तेंडोलकरांची मोठी माड बागायत होती. माकडांच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी अख्या बागेवरच बुलडोजर फिरवला. अशीच मानसिकता इतर बागायतदारांची झाल्यास यात आश्‍चर्य वाटणार नाही.अनेक  मोठे बागायतदार माकडांमुळे बेजार झाले आहेत.

हत्‍ती गेले...आता माकडांना घालवा

माकडांचा कायमचा बंदोबस्त कसा करायचा याचे उत्‍तर ना बागायतदार शेतकरी ना वनविभागाकडे आहे. बागायतींतून माकडांना पिटाळण्याचा प्रयत्न होतो. या प्रयत्नात हा प्राणी मरू नये याचीही काळजी घेताना शेतकरी दिसतो. दरम्यान, वनविभागाने यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची शेतकर्‍यांची मागणी आहे. हत्‍तींचा बंदोबस्त होवू शकतो मग माकडांचा का नाही? असा सवालही शेतकरी उपस्थित करीत आहे. दरम्यान वनविभागाचा माकड नुकसानीचा प्रति नारळ फळ दर 7 रू.आहे.वनरक्षक, कृषीसहाय्य व तलाठी नुकसानीचा सर्वे करून पंचनामा करतात. सद्यस्थितीत  लाखो रूपयांची नुकसानी झालेली असताना कुडाळ परिक्षेत्रात 2018-19 या वर्षात केवळ अडीज लाख रु.नुकसानभरपाई वनविभागाकडून दिली गेली आहे.

नुकसान भरपाईचा घोळ

वनविभागाकडून माकडांपासून झालेल्या नारळ फळांची नुकसानी मिळते याबाबत अनेक लोकांपर्यंत माहिती पोचलेली नाही.वनविभागाने याबाबतीत पुढाकार घेतल्याचे कुठे दिसत नाही. अर्ज आल्यावर नुकसानी देवू ही नेहमीची उत्‍तरे ऐकायला मिळतात. नुकसानी संदर्भात तक्रारीची दखल वनविभाग घेत नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. कुडाळ व कडावल वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार शासकीय अधिनियमानुसार माकड या वन्य प्राण्यांकडून होणार्‍या नुकसानग्रस्थांकडून नुकसानीसंदर्भात प्रस्ताव येत नाहीत तर  शेतकर्‍यांना नुकसानी मिळणार कशी?असा प्रश्‍न वनविभागाकडून उपस्थित केला जात आहे.