Wed, Jul 24, 2019 14:12होमपेज › Konkan › महिला कंडक्टरचा विनयभंग : टी.सी.वर गुन्हा दाखल

महिला कंडक्टरचा विनयभंग : टी.सी.वर गुन्हा दाखल

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 20 2017 10:39PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

ड्युटीवर असलेल्या महिला कंडक्टरचा मॅन्युअल ट्रे व कॅश तपासण्याच्या बहाण्याने तिच्या हातास धरून एसटी बसमध्ये तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत अश्‍लिल संभाषण केल्याप्रकरणी कणकवली आगारातील तिकीट तपासणीस शिवाजी यु. राठोड (रा. फोंडाघाट) याच्याविरूध्द महिला कंडक्टरच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही घटना 15 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वा. कणकवली बसस्थानकात घडली.  फिर्यादी महिला कंडक्टर ही फोंडा-कणकवली ही बस फेरी घेऊन कणकवली बसस्थानकात आली होती. बसस्थानक आवारात एसटी बस थांबल्यानंतर प्रवासी उतरून गेले. यावेळी तिकीट तपासणीस शिवाजी राठोड याने कॅश चेक करण्याच्या बहाण्याने त्या महिला कंडक्टरचा विनयभंग केला. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलिस हवालदार सौ. माधुरी अडुळकर करत आहेत. 

टी.सी.ला निलंबित करा : इंटकची मागणी

तिकीट तपासणीस शिवाजी राठोड याने एसटीच्या महिला कंडक्टरचा विनयभंग केल्याच्या घटनेला चार दिवस उलटले तरी त्याच्याविरूध्द कोणतीही कारवाई एसटी प्रशासनाने केलेली नाही, याबाबत संताप व्यक्त करत बुधवारी इंटक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी विभागनियंत्रक चेतन हसबनीस यांची भेट घेऊन शिवाजी राठोडवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी श्री. हसबनीस यांनी राठोड यास काम थांबवण्यास सांगितले जाईल, अशी ग्वाही दिली. 

यावेळी इंटक संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष अशोक राणे, सेक्रेटरी एच.बी.रावराणे, डेपो अध्यक्ष गणेश शिरकर, डेपो सेक्रेटरी संजय सावंत, संतोष भाट, एम.पी.पवार, बी.एम.भाईप, मयुरी चौगुले, टी.पी. कांबळी आदी उपस्थित होते. 

एका महिला कंडक्टरचा विनयभंग झाल्याची गंभीर घटना असूनही एसटी प्रशासन त्याकडे गांभिर्याने पाहत नाही ही दुर्दैवी बाब आहे. काही दिवसांपूर्वी दोन चालकांमध्ये भांडण झाले, त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.मग या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष का केला गेला? अशी विचारणा अशोक राणे व एच.बी.रावराणे यांनी विभाग नियंत्रकांना केली. एसटीच्या तिकीट चेकरला डिपार्टमेंटने जो प्रोग्रॅम दिला आहे त्याचवेळी त्याने चेकींग केली पाहिजे असा नियम आहे. मात्र शिवाजी राठोड याने शुक्रवारी फोंडा-कणकवली ही शटल गाडी चेेकींगसाठी थांबविली तेव्हा तो युनिफॉर्मवरही नव्हता. चेकींग केली तेव्हा त्याला गाडीच्या तिकीटामध्ये कोणतीही आक्षेपार्ह बाब दिसून आली नाही, तरीही त्याने वाहक महिलेस जबाब घेण्यासाठी थांबवून ठेवले, ड्रायव्हरला तेथून जाण्यास सांगितले. 

वास्तविक जबाबासाठी ड्रायव्हरलाही थांबवून ठेवणे गरजेचे होते, परंतु त्याने ते केले नाही. त्याच्यासोबत चेकींगसाठी अन्य अधिकारीही नव्हते, याचीच संधी घेऊन त्याने हा विनयभंगाचा प्रकार केला. तशी तक्रारही पीडित महिलेने आपल्याजवळ  दिली असताना तुम्ही दुर्लक्ष का केला? असा सवाल इंटक पदाधिकार्‍यांनी केला. या घटनेचा मानसिक त्रास त्या वाहक महिलेच्या कुटुंबाला सोसावा लागत आहे. हा संवेदनशील प्रकार पाहता एस.टी. प्रशासनाच्या अखत्यारीत जी कारवाई करणे योग्य आहे ती तत्काळ करा, अशी मागणी पदाधिकार्‍यांनी केली.