Mon, Jun 24, 2019 16:38होमपेज › Konkan › कमी व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष; पावणे नऊ लाखांची फसवणूक

आधुनिक गृहनिर्माण वित्तीय कॉर्पोरेशन संस्थेच्या एकाला सीआयडीकडून अटक

Published On: Jun 19 2018 10:47PM | Last Updated: Jun 19 2018 9:59PMरत्नागिरी : प्रतिनिधी

बँका, पतसंस्था, पोस्ट खात्यापेक्षा जास्त दराने व्याज आणि कमी व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून 596 ग्राहकांची सुमारे 8 लाख 84 हजार 965 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आधुनिक गृहनिर्माण वित्तीय कॉर्पोरेशन संस्थेच्या 23 संशयितांपैकी एकाला ‘सीआयडी’ने सोमवारी अटक केली. त्याला मंगळवार 19 जून रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. फसवणुकीची ही घटना मार्च 2002 ते फेब्रुवारी 2004 या कालावधीत घडली होती.

प्रकाश रावजी बोळकार (56, रा. वर्धा) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात संदीप यशवंत पारकर (रा. वरवडे भंडारवाडी, रत्नागिरी) यांनी 26 मार्च 2006 रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार, प्रकाश बोळकार आणि अन्य 22 जणांनी संगनमताने आधुनिक गृहनिर्माण वित्तीय कॉर्पोरेशन संस्थेच्या ठिकठिकाणी शाखा उघडल्या होत्या. यातील एक शाखा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत होती. या शाखांमध्ये आरोपींनी व्यवस्थापक, शिपाई, कॅशियर पदाच्या नेमणुकाही केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी नागरिकांना बँका, पतसंस्था आणि पोस्ट खात्यापेक्षा जास्त दराने व्याज आणि कमी दराने कर्ज  देण्याचे आमिष दाखवून एकूण 596 ठेवीदारांकडून सुमारे 8 लाख 84 हजार 965 रुपयांच्या ठेवी घेऊन त्यांची फसवणूक केली. 

फसवणूक झाल्याचे समजताच संदीप पारकर यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती. परंतु, यातील 23 संशयित फरारी होते.