Mon, Aug 19, 2019 10:02होमपेज › Konkan › जिल्हा विधी प्राधिकरण करणार मोबाईल समुपदेशन

जिल्हा विधी प्राधिकरण करणार मोबाईल समुपदेशन

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 06 2018 1:32AMरत्नागिरी ः प्रतिनिधी

शालेय आणि महाविद्यालयीन तरुण-तरूणी मोबाईलच्या खूप आहारी गेले आहेत. त्यामुळे बहुतांश मुले मोबाईल, इंटनेटच्या दुनियेत मग्न असतात. यामुळे दिवसेंदिवस या शालेय मुलांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. त्यांना या सगळ्या गोष्टींतून बाहेर काढण्यासाठी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण 15 जुलै ते 31 जुलै या कालावधीत प्रत्येक शाळेत जाऊन मुलांशी संवाद साधणार आहे. शाळेत त्यांचे समुपदेशन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य सचिव न्यायाधीश आनंद सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत जिल्ह्यात वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असतात. जिल्हा विधी सेवेच्या वतीने  गरीब, होतकरूंसाठी मोफत मार्गदर्शन केले जाते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यावर्षी शालेय मुलांसाठी एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 15 जुलै 31 जुलै या 15 दिवसांच्या कालावधीत विधी सेवा प्राधिकरणाची टीम रत्नागिरी शहरातील 20 शाळांमध्ये जाऊन टप्प्या-टप्प्याने संवाद साधणार आहे.  

यामध्ये मुलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना, मुलांचे लैंगिक शोषण आणि समाजाची नैतिक जबाबदारी, मुलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी पालकांची आणि समाजाची भूमिका, मुलांचे लैंगिक शोषण आणि मूल्यशिक्षण, मोबाईल आणि मुले, बालक-पालक आणि इंटरनेट, मुलींचे अस्तित्व आणि शिक्षणाचा अधिकार, मुलगा - मुलगी समानता आणि सामाजिक विकास, लिंग भेदभाव आणि कुटुंबाची नैतिक जबाबदारी, मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार, मुलांच्या हिताच्या आणि सुरक्षिततेच्या द‍ृष्टीकोनातून वाहतूक नियम, इंटरनेट, प्रसारमाध्यमे आणि मुलांची सुरक्षितता, व्यसनाधिनतेच्या शापातून बालकांना कसे रोखाल, बालकांच्या व्यसनाधिनता आणि त्यामागील मानसिकता, व्यसनाधिनतेच्या गर्तेत जाण्यापासून मुलांनी स्वत:ला कसे राखावे, नीतिमूल्याचे बाळकडू आणि मुलांचा व्यक्‍तिमत्व विकास आदी विषयांवर शाळेतील मुलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

याच विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात येत असून या निबंध/लेख स्पर्धेसाठी 31 जुलै ही अंतिम तारीख ठेवण्यात आली असल्याचेही न्यायाधीश सामंत यांनी सांगितले.  हे निबंध 31 जुलैपर्यत रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय खारेघाट सभागृह याठिकाणी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडलेल्या लेखांपैकी प्रथम चार निबंधांच्या लेखकांचा जिल्हा विधी  सेवा प्राधिकरणातर्फे सत्कार केला जाणार आहे.