Tue, Apr 23, 2019 08:12होमपेज › Konkan › वटमुखत्यारपत्राचा गैरवापर; 76 लाख रुपयांची फसवणूक

वटमुखत्यारपत्राचा गैरवापर; 76 लाख रुपयांची फसवणूक

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 13 2018 11:07PMरत्नागिरी : प्रतिनिधी

वटमुखत्यारपत्राचा गैरवापर  करीत 27 जमिनींची विक्री करून सुमारे 76 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरोधात  येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात सुरेंद्र व्यंकटेश साळवी (झाडगाव, रत्नागिरी), शकील हमीद डिंगणकर (नेवरे, रत्नागिरी), अल्ताफ जाफर संगमेश्‍वरी (एमआयडीसी, रत्नागिरी) आणि इम्तियाज आ. रेहमान मुजावर (एमआयडीसी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध संजय मधुकर साळवी (55, रा. साळवी रेसिडेन्सी पनवेल, जि. रायगड) यांनी सोमवारी 12 फेब्रुवारी रोजी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार संजय साळवी यांनी सुरेंद्र साळवी याला त्यांच्या सामाईक मालकीची रत्नागिरी तालुक्यातील कसोप येथील जमिनीची विक्री करण्यासाठी वटमुखत्यारपत्र करून दिले होते. फसवणुकीची ही घटना 17 फेब्रुवारी 2012 ते 7 सप्टेंबर 2017 या कालावधीत घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सन 2012 ते 2017 या कालावधीत या चार संशयित आरोपींनी परस्पर संगनमताने वटमुखत्यारपत्रातील पान क्र. 1 ते 3 मधील मजकुरात बदल करून त्यात ‘कसोप’ ऐवजी भंडारपुळे असा उल्‍लेख करून 27 जमिनींचे बनावट वटमुखत्यारपत्र तयार केले. हे बनावट वटमुखत्यारपत्र स्वत:च्या फायद्यासाठी वापरून संजय साळवी यांच्या मालकीच्या जमिनीची विक्री करून त्यांची 76 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

याबाबत ग्रामीण पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक ओटवणेकर करत आहेत.