Thu, Jun 27, 2019 00:09होमपेज › Konkan › मिशन कोकणचे व्हिजन नेतृत्व

मिशन कोकणचे व्हिजन नेतृत्व

Published On: Mar 16 2018 10:54PM | Last Updated: Mar 16 2018 10:54PMप्रमोद पेडणेकर

पूर्वीचा राजापूर व आताचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा मतदारसंघ देशभरात नेहमीच चर्चेचा मतदारसंघ राहिला आहे. बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते ते अगदी सुरेश प्रभुंपर्यंत सर्वांनीच लोकसभेत या मतदारसंघाला मोठा नावलौकीक मिळवून दिला आहे. चर्चा मग ती मतदारसंघातील एखाद्या प्रश्‍नासंदर्भात असो वा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुद्यांबाबत असो, नाथ पै, दंडवते व सुरेश प्रभू यांनी संसदेच्या कामकाजात मोठं नाव कमावलं आहे. तोच वसा वय लहान असेल, पण नीलेश राणे या उमद्या, अभ्यासू व परखड व्यक्तिमत्त्वाच्या तरूणाने आपल्या खासदारकीच्या कालखंडात या परंपरेला साजेसंच योगदान देत जपला आहे, हे नाकारता येणार नाही. एकीकडे नारायण राणेंसारखं मोठं नाव व दुसरीकडे संसदीय कामकाजात ठसा उमटविणार्‍या या तिन्ही नावांना गौरवास्पद वाटेल अशी प्रतिमा नीलेश राणे यांनी जपली यात शंका नाही.

वयाच्या अवघ्या पंचविशीत नीलेश राणे या मतदारसंघाचे खासदार झाले. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एकीकडे नारायण राणेंसारखं वडील म्हणून असलेलं मोठं नाव, त्यांचा राजकारणातील दबदबा, रूबाब सांभाळायचाच, तर दुसरीकडे या मतदारसंघाला असलेली मोठी संसदीय नेतृत्वाची परंपरा तेवढ्याच तोलामोलाने पुढे न्यायचे हे मोठं आव्हान होतं. नीलेश राणे यांनी दोन्ही स्तरावर रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जनतेला हेवा वाटेल असंच काम केलं. दुर्दैवानं आणखी पाच वर्षांची टर्म त्यांना मिळाली नाही. परंतु, पराभवाने खचून न जाता तेवढीच धमक व ताकद घेऊन ते सध्या लोकांमध्ये काम करताहेत हे विशेष म्हणावे लागेल. तसे नीलेश राणे हे करारी व्यक्तिमत्त्वाचे, परखड स्वभावाचे, रोखठोक भूमिका मांडणारे म्हणून ओळखले जात असले तरी त्यांच्यातील एका मृदू व हळव्या नेतृत्वाचे दर्शनही कार्यकर्त्यांना होते. लहान वयातच दिल्लीच्या राजकारणात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. पाच वर्षे ते अत्यंत तडफेने संसदेत रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या प्रश्‍नांना लोकसभेत मांडत राहिले. 
वास्तविक, बॅ. नाथ पै, मधु दंडवते यांची संसदीय परंपरा व्यासंगी, मुद्देसूद भाषणांची व मतदारसंघांपेक्षा या दोन्ही नेतृत्वांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांवरच संसदेत काम केले. तसा हा मतदारसंघ सागरी किनारपट्टीचा. शेतकरी, कष्टकरी व बहुजन समाज बहुसंख्य असलेल्या मतदारसंघामध्ये खर्‍या अर्थाने विकासाला दिशा आली ती नारायण राणेंच्या सिंधुदुर्गातील राजकीय आगमनानंतरच. राणे मुख्यमंत्री झाल्यावर कोकणच्या विकासाला स्पष्ट दिशा मिळाली. खासदार म्हणून सुरेश प्रभू यांनीही या विकासाला एक वेगळा आकार दिला. परंतु,नारायण राणेंच्या विकासाची व्याख्या वेगळी होती. या विकासाच्या व्याख्येत आर्थिक उन्नतीवर भर होता. जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा जलदगतीने निर्मिती करण्याचा ध्यास होता. सिंधुदुर्गातून मुंबईला जाणार्‍या तरूणाला रोजगार, व्यवसायाच्या माध्यमातून गावातच थांबविण्याची योजना होती. या सगळ्या स्तरावर नारायण राणेंनी कोकणात भरीव काम केले. मात्र, या सर्वच कामावर छाप अर्थात नीलेश राणेंचीच होती. हे पुढे ते खासदार झाल्यावर सिद्ध झाले. दंडवते, नाथ पै यांचे सोडाच, त्या काळात दळणवळणाची साधने मर्यादित होती. गावोगावी रस्तेही नव्हते. परंतु, त्या नंतरच्या काळात गेल्या पंचवीस वर्षांमध्ये प्रचंड जनसंपर्क असलेला व प्रत्येक गावात पोहोचलेले नीलेश राणे हे एकमेव खासदार आहेत, यात शंका नाही. तरूण व उमदे नेतृत्व, प्रश्‍न समजून घेण्याची व त्याची उकल करण्याची त्यांची क्षमता त्यांच्या खासदारकीच्या काळात दिसून आली. आपला खासदार निधी शंभर टक्के खर्च करणारेही ते राजकीय नेतृत्व होते. विकासाचे राजकारण व व्हिजन ही राणे कुटुंबियांना एक देणगीच मिळाली आहे. नारायण राणे यांच्या बरोबरीनेच नीलेश राणे यांनीही जनसेवक म्हणून अनुभव कमी असला तरी वकूब तोच आहे, हे त्यांनी दाखवून दिले. छोट्या-छोट्या वाडीवस्त्यांवर पाखाड्यांपासून रस्त्यांना त्यांनी प्राधान्य दिले. वास्तविक ही कामे स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींची असतात. पण ही कामेही नीलेश राणे यांना हातावेगळी करावी लागली. दुर्गम वाडीवस्त्यांवरील जनतेची ती गरज होती. अशा कामांना प्राधान्य देतानाच त्यांनी पर्यटन, रोजगार निर्मितीभिमुख व्यवसायांनाही उत्तेजन दिले. संसदेत अभ्यासपूर्ण भाषणे करुन त्यांनी समर्थ वारसदार असल्याचे दाखवून दिलेच, परंतु रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या विकासासाठी दिल्लीतील राजकीय वर्तुळात व्यक्तीगत संबंधही जोडले व त्याचा फायदा अनेक योजनांना कोकणसाठी मंजुरी मिळवून त्यांनी करून घेतला. दुर्दैवानं 2013 च्या मोदी लाटेत ते पराभूत झाले तरी पराभूत मानसिकतेत न राहता जिद्दीने ते लोकांमध्येच राहिले. विद्यमान खासदारांपेक्षा माजी खासदारांचेच दर्शन जास्त होते, अशी जिल्ह्यातील जनताच म्हणत आहे. नाणारच्या रिफायनरीला कडाडून विरोध हाही त्यांच्या आक्रमक व कोकण हिताच्या राजकारणाचा गाभा म्हणता येईल. लोकांच्या अपेक्षांना सध्या ते भिडत आहेत. पूर्वीपेक्षा आपण अधिक प्रगल्भ झालो आहोत हेही त्यांनी गेल्या चार वर्षांत दाखवून दिले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या विकासासाठी ‘मिशन कोकणचे व्हिजन नेतृत्व’ म्हणूनच त्यांच्याकडे आता पाहिले जात आहे. विकासासाठी ते आता गरजेचे आहे.