Tue, May 21, 2019 00:21होमपेज › Konkan › तळगावमधील बेपत्ता वृद्धाचा कुडाळात खून

तळगावमधील बेपत्ता वृद्धाचा कुडाळात खून

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 10:24PMकुडाळ : प्रतिनिधी

प्रेमात अडसर ठरत असल्याच्या कारणाने आनंद दिगंबर साळगावकर (39,कुडाळ कविलकट्टा) व सुनीता पुंडलिक राठोड(25, मुळ कर्नाटक,सध्या रा.कुडाळ पानबाजार) यांनी संगनमताने विजय विष्णू सावंत (64,तळगाव राऊतवाडी)यांचा कुडाळ पानबाजार येथील सुनिताच्या राहत्या खोलीत खुन करून मृतदेह भंगसाळ नदीपात्रात फेकून दिला. ही घटना रविवार 26 ऑगस्ट रोजी घडली. याबाबत निवती पोलिस ठाण्यात आनंद साळगावकर व सुनीता राठोड या  दोघां विरूध्द  खुनाचा गुन्हा दाखल केला. सदर  गुन्हा कुडाळ हद्दीत घडला असल्याने तो गुन्हा कुडाळ पोलिसाकडे वर्ग करण्यात आला. पोलिस निरीक्षक जगदीश काकडे यांनी संशयित सुनीता राठोड हिला बुधवारी सकाळी घटनास्थळी नेऊन चौकशी सुरू केली.दरम्यान दोन्ही संशयितांना कुडाळ न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली.

पोलिस निरीक्षक जगदीश काकडे यांनी या गुन्हाच्या तपासाकरीता सर्व यंत्रणा कामाला लावली. बुधवारी सकाळी पोलिसांनी घटनास्थळी संशयीत सुनिता हिला घेवून जात कुडाळ- पानबाजार येथील सुनीताच्या भाड्याच्या खोलीची पाहणी केली. सदर खोलीच्या एका बाजुला चिकन सेंटर तर दुसर्‍या बाजुला टेलर व समोर दुकाने आहेत. सुनीता हीने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. या खोलीत एकूण तीन रूम व पोटमाळा आहे. या खोलीचा संपूर्ण तपास पोलिसांनी दोन शासकीय पंचासमवेत केला. तसेच खोलीच्या बाजुला असलेल्या व्यवसायिकांकडुनही  माहिती घेतली. विजय सावंत यांचा खुन केल्यावर त्यांचा मृतदेह आदी खोलीत व त्यानंतर बाथरूम मध्ये ठेवल्याचे सुनीताने सांगितले. त्या ठिकाणाहून पिशवीत भरून मृतदेह  कशा पध्दतीने भंगसाळ नदीपर्यंत नेला याची परिपूर्ण माहिती तीने पोलिसांना दिली.  पोलिस निरीक्षक जगदीश काकडे, उपनिरीक्षक गायत्री पाटील, शितल पाटील,एस.डी.राठोड, पोलिस नाईक  अमरीश किनळेकर, अमित राऊळ, अर्चना धर्णे, श्री. जाधव, श्री.मुंडे आदी उपस्थित होते.

मालवण तालुक्यातील तळगांव येथील विजय विष्णू सावंत हे बेपत्‍ता असल्याची फिर्याद 28 ऑगस्ट रोजी त्यांचा मुलगा सिध्देश सावंत यांनी  मालवण-कट्टा पोलिस दूरक्षेत्रात दिली होती. 26 ऑगस्टला दु. 12.45 वा. आपण ओरोसला जातो असे सांगुन विजय सावंत घरातून बाहेर पडले होते. त्यांची मोटरसायकल कुडाळ पानबाजार येथील सुनिता राठोड हिच्या खोलीजवळच आढळुन आली होती. दरम्यान 30 ऑगस्टला देवबाग संगम येथे अनोळखी मृतदेह आढळला होता. तो मृतदेह भंगसाळ नदी पात्रातून भोगवेच्या दिशेने गेल्याची माहिती निवती पोलिसांना मिळाली. निवती पोलिसांनी शोध घेत कुजलेला मृतदेह बाहेर काढून सिंधुदुर्गनगरी येथे शवागृहात ठेवला. मृतदेहावरील कपडे व खिशातील चाव्यांवरून मुलगा सिध्देश सावंत याने वडिलांचा मृतदेह ओळखला.

भाजीवाले, मासेवाले यांच्याशी चौकशी केली असता विजय सावंत कुडाळ येथील  सुनिता राठोड हिच्याकडे येत जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून मच्छीविक्री व्यवसाय करणार्‍या सुनीता राठोड  ची पोलिसांनी चौकशी केली. मात्र तिने अपेक्षित माहिती दिली नाही. दरम्यान आनंद साळगावकर याचे सुनीताशी जवळचे संबंध असल्याची माहिती तपासात पुढे आली होती. या माहितीवरून पोलिसांनी सुनीताला आनंद साळगावकरचा नंबर विचारला, मात्र तो नंबर सुनीताने दिला नसल्याने पोलिसांचा संशय वाढला. दरम्यान  मालवण पोलिसांनी आनंद साळगावकरला कट्टा पोलिसस्थानकात चौकशीसाठी बोलावून घेतले. सुरूवातीला साळगावकरने उडवाउडवाची उत्‍तरे दिली. मात्र पोलिसी हीस्का दाखवताच तो शांत झाला. अखेर निवती पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली  निवती व मालवण पोलिसांचे पथक 1सप्टेंबरला विजापूर येथील सुनीताच्या गावाकडे गेले व तिला ताब्यात घेवून 4 सप्टेंबरला निवती पोलिस स्थानकात दाखल झाले. यावेळी चौकशी केली असता या दोन्ही संशयीतांनी खुनाची कबुली दिली. सुनीता ही विजय सावंत यांना आबा या नावाने बोलायची.  26 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा.विजय सावंत(आबा) यांचा साळगावकर यांच्या मोबाईलवर मला फोन आला.तो फोन साळगावकर यांनी माझ्याकडे दिला. यावेळी आबांनी तु कशी आहेस? कुठे आहेस? साळगावकर चांगला माणुस नाही, तु गावी जा असे ते फोनवर बोलले. त्यानंतर साळगावकर याच्या सांगण्यावरून आबांना मी घरी बोलवले. साळगावकर घरातील माळीवर लपून बसला होता.आबा 26 ऑगस्टला दु. 1.10 वा. च्या सुमारास माझ्या खोलीवर आले असता मी आबा यांच्या थोबाडीत मारले, त्यानंतर साळगावकर याने माळ्यावरून खाली येत आबांच्या डोक्यावर स्टिल रॉड मारला व तोंडावर उशी दाबुन धरली त्यात त्यांचा मृत्यु झाला.  27 ऑगस्ट रोजी रात्री 2 वा.च्या सुमारास साळगावकर माझ्या घरी आला ,त्याने मृतदेह धरण्यासाठी मला विनंती केली. पण मी सहकार्य केले नसल्याने एकटयानेच गोणीत प्रेत भरून खांद्यावर घेत भंगसाळ नदीपात्र गाठले. प्रेताच्या खिशातील मोबाईल फोडून प्रेताच्या अंगावरील कपड्याच्या खिशात ठेवला व नदीच्या पाण्यात मृतदेह फेकला. अशी निवती  सुनिता हीने जबानी दिली.

खुणासाठी वापरलेला रॉड मिळाला 

विजय सावंत यांचा खुन करण्यासाठी वापरलेला स्टिलचा रॉड आनंद यांने नदीपात्रात टाकला होता. तो रॉड हस्तगत करण्यासाठी तपासी अधिकार्‍यांनी मालवण येथील स्कुबा डायव्हरच्या सहकार्याने भंगसाळ नदीपात्रात शोध घेतला असता तो सापडून आला. दरम्यान या खुनप्रकरणातील सक्षम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे तपासी अधिकारी कुडाळ पोलिस निरीक्षक जगदीश काकडे यांनी सांगितले.