Thu, Jan 30, 2020 00:16होमपेज › Konkan › लाटांच्या तडाख्यामुळे मिर्‍या बंधार्‍याला भगदाड

लाटांच्या तडाख्यामुळे मिर्‍या बंधार्‍याला भगदाड

Published On: Jul 02 2019 2:05AM | Last Updated: Jul 02 2019 1:20AM
रत्नागिरी : प्रतिनिधी

दोन दिवसांपूर्वी पडलेल्या जोरदार पावसामुळे आणि समुद्राने रौद्ररूप धारण केल्याने त्याचा फटका समुद्र किनापट्टीला बसला आहे. सोमवारी अमावस्या असल्याने समुद्राच्या लाटांचे तांडव पाहायला मिळत  होते. सुमारे साडेचार मीटर उंचीच्या लाटा समुद्रकिनार्‍यावर धडकत होत्या. या लाटांच्या मार्‍याने मिर्‍या येथील धूपप्रतिबंधक बंधार्‍याला सुमारे वीस मीटरपेक्षा अधिक लांबीचे भगदाड पडले आहे. यामुळे मिर्‍या, अलावा व पंढरामाड परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कोकणपट्टीवर गेले चार दिवस जोरदार पावसामुळे समुद्र खवळला आहे. लाटाही उंचचउंच उसळत आहे. भाट्ये समुद्रकिनारा, मांडवी, मिर्‍या भागात समुद्राच्या लाटांचे तांडव पाहायला मिळत आहे. मांडवीमध्येही लाटा संरक्षण बंधार्‍याला धडकत आहेत. त्यामुळे लाटांचे पाणी घुसण्याची शक्यता आहे.

सोमवारी दुपारनंतर अमावस्या सुरू झाली. मंगळवारी दुपारपर्यंत अमावस्या असल्याने या कालावधीत समुद्राला अधिक उधाण येते. लाटांची उंचीही वाढते. सोमवारी दुपारी भरतीच्यावेळी लाटांचे तांडवच दिसून येत होते. लाटांच्या रौद्ररूपामुळे प्रचंड आवाज येत होता. 

मिर्‍या येथील धूपप्रतिबंधक बंधार्‍यावर प्रचंड वेगाने लाटा आपटत असल्याने येथील डागडुजी करण्यात आलेल्या बंधार्‍याला भगदाड पडले आहे. एक हजार किलो वजनाचे मोठे दगडही लाटांच्या तडाख्याने वाहून जात होते. लाटांचा जोर कायम राहिल्यास या बंधार्‍याचा भाग वाहून जाऊन लाटा लोकवस्तीत घुसण्याची शक्यता आहे. 

दरवर्षी या भागात बंधार्‍याला भगदाड पडून लोकवस्तीत पाणी घुसते. त्यामुळे नागरिकांमध्ये लाटांची भीती निर्माण झाली आहे. पावसाने सोमवारी काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी मोठ्या उंचीच्या लाटा पाहण्यासाठीही नागरिक किनार्‍यावर गर्दी करु लागले आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सावधानता व सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.