Wed, Jul 17, 2019 10:34होमपेज › Konkan › मिरकरवाडा बंदर घेतेय मोकळा श्‍वास

मिरकरवाडा बंदर घेतेय मोकळा श्‍वास

Published On: Dec 11 2017 1:30AM | Last Updated: Dec 10 2017 9:29PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : वार्ताहर

मिरकरवाडा बंदरातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. महिन्यात 36 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. दुसर्‍या टप्प्यातील या कामामुळे बंदरातील गाळाचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटणार आहे.

दर्जेदार मासळीसाठी देशातले 2 नंबरचे बंदर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मिरकरवाडा बंदरातील गाळ काढण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. फ्लोटिंग ड्रेझरद्वारे मिरकरवाड्यातील गाळ उपसा सुरू करण्यात आला आहे. भरती ओहोटीच्या वेळा साधून सध्या गाळ उपसला जात आहे.

कोकणातील एक महत्त्वाचे बंदर म्हणून मिरकरवाडा बंदर ओळखले जाते. मात्र सध्या या बंदरात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. हायड्रोग्राफिक सर्वेनुसार मिरकरवाडा बंदरात 2 लाख 87 क्यूबिक मीटर गाळ साचलेला आहे. सध्या मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी फेज 2 अंतर्गत निधी मंजूर झालेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या फ्लोटिंग ड्रेझरद्वारे मिरकरवाडा बंदरातील गाळ उपसला जात आहे. 

मिरकरवाडा बंदरात सुमारे 350 नौका येतात. मात्र, गाळामुळे या नौकांना भरतीच्या पाण्याची वाट पहात थांबावे लागते. आता मात्र गाळाचा उपसा होत असल्याने नौकांना बंदरात येण्यास अडचणी जाणवत नाहीत. परंतु, नौका उभ्या असणार्‍या जेटीमधील गाळाचा उपसा होणे आवश्यक आहे. दुसर्‍या टप्प्यातील गाळ काढण्याच्या कामाला 67.30 कोटी रूपयांची तांत्रिक मान्यता मिळाली आहे. त्यापैकी बंदर विभागाला 35.84 कोटीचा निधी प्राप्‍त झाला आहे.

गाळ काढण्याचे काम ठेकेदार डी. व्ही. पवार  करत आहेत. या कामामुळे बंदरातील गाळाचा प्रश्‍न कायमचा मिटून बंदर विकसित होईल. मिरकरवाडा बंदरातील दुसर्‍या टप्प्यातील पश्‍चिमेकडील ब्रेक वॉटर वॉलचे 150 मीटर लांबी वाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. उत्तरेकडील 675 मीटर लांबीच्या नवीन ब्रेक वॉटर वॉलपैकी 525 मीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. पुढील काम प्रगतीपथावर असल्याचे बंदर विभागाने सांगितले.