Mon, Apr 22, 2019 12:17होमपेज › Konkan › शाश्‍वत विकासासाठी वैज्ञानिक विचार प्रबळ व्हावेत

शाश्‍वत विकासासाठी वैज्ञानिक विचार प्रबळ व्हावेत

Published On: Dec 20 2017 1:41AM | Last Updated: Dec 19 2017 11:41PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी

देश व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विज्ञानाची कास धरावीच लागेल. आज जगभरातील प्रगत देश हे वैज्ञानिक पायावर भक्‍कम उभे आहेत. या विज्ञानाच्या बळावरच अमेरिका जगातील बलाढ्य देश बनला आहे. विज्ञानाच्या माध्यमातून शेतीची प्रगती, समाजाची प्रगती, औद्योगिकरण अशा अनेक प्रश्‍नांवर आपण मार्ग काढू शकतो. त्यामुळे शाश्‍वत विकास साधण्यासाठी लोकांमध्ये वैज्ञानिक विचार प्रबळ व्हायला हवेत, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. मराठी विज्ञान परिषद, वसुंधरा विज्ञान केंद्र यासारख्या संस्था यासाठी अथक प्रयत्न करीत असून, आपण त्यांचे हात आणखी बळकट करूया, असे आवाहन त्यांनी केले. 

नेरूरपार-कुडाळ येथील वसुंधरा विज्ञान केंद्रात आयोजित या विज्ञान अधिवेशनाच्या सांगता सोहळ्यास  ना. प्रभू यांनी  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले. व्यासपीठावर अधिवेशनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. उल्हास राणे, स्वागताध्यक्ष तथा वसुंधराचे संस्थापक सी. बी. नाईक व विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. ज्येष्ठराज जोशी, सचिव अ. पां. देशपांडे, कार्यवाह जयंत जोशी, विज्ञान केंद्राचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त अविनाश हावळ,  सतीश नाईक, गजानन कांदळगावकर, ल्युपिन फाउंडेशनचे योगेश प्रभू आदी उपस्थित होते. अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल वसुंधराच्या पदाधिकारी व कर्मचार्‍यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. तसेच अधिवेशनानिमित्त आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले.पुढील 53 वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन चाळीसगावला होण्याची शक्यता आहे. घरडा केमिकल्स, ल्युपिन फाउंडेशन, एमकेसीएल आदी संस्थांनी या अधिवेशनाला सहकार्य केले. तृप्ती राणे व दीप्ती मोरे यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश हावळ यांनी आभार मानले.