Mon, Apr 22, 2019 05:41होमपेज › Konkan › मालवणातील २४० घरांतील कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा

मालवणातील २४० घरांतील कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा

Published On: Jun 12 2018 12:52AM | Last Updated: Jun 11 2018 10:42PMमालवण : प्रतिनिधी

मालवण तालुक्यात अतिवृष्टीमुळे देवली, काळसे, माळगाव, धामापूर, देवबाग, देऊळवाडा, मर्डे, मसुरे आदी भागात धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने या भागातील ग्रामस्थांना धोका पोहोचू शकणार्‍या एकूण 240 घरांना सतर्कतेच्या सूचना व स्थलांतराच्या नोटिसा मालवण तहसील कार्यालयाकडून बजावण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, गेले तीन दिवस मालवण तालुक्याला झोडपून काढणार्‍या पावसाने आज सोमवारी काहीशी उसंत घेतली होती. मालवणात आतापर्यंत 759 मिलिमीटर पावसाची नोंद मालवण तहसीलदार कार्यालयात झाली आहे. मालवण तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने तालुक्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडून मोठे नुकसान झाले. मात्र, तीन दिवस अहोरात्र  कोसळणार्‍या पावसाने रविवारी मध्यरात्री अधूनमधून हजेरी लावल्यानंतर सोमवारी सकाळपासून विश्रांती घेतली.रात्री सोसाट्याच्या वार्‍यामुळे रॉक गार्डन परिसरातील खाद्यपदार्थांचा एक स्टॉल कोसळून स्थानिक व्यावसायिकाचे नुकसान झाले. मालवण शहरातील सोमवारी अधुनमधून वीज पुरवठा खंडित होत राहिल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला. दरम्यान, दिवसभर विश्रांती घेणार्‍या पावसाने सायंकाळी मालवण तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. 

240  जणांना स्थलांतरणाच्या नोटिसा...!

मालवणात झालेल्या अतिवृष्टीमुळे देवली व धामापूर येथे दरड कोसळून घरांना धोका निर्माण झाला होता. यामुळे तालुका प्रशासनाने तालुक्यात धोकादायक स्थिती निर्माण झालेल्या भागातील घराना स्थलांतराच्या नोटिसा बजावण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये देवली येथील 20, काळसे येथील 10 माळगाव येथील 7, धामापूर येथील 3, देऊळवाडा 10, मर्डे येथील 10, तसेच देवबाग येथील 180 अशा एकूण 240 घरांना सतर्कतेच्या व स्थलांतराच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. नोटिसा बजावण्याचे काम तहसीलदारांच्या आदेशानुसार तलाठ्यांकडून सुरू आहे. तर मसुरे गावात संभावित पुरजन्य परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने प्रशासनाकडून संपूर्ण मसुरे गावाला जाहीर सूचना देण्यात आली आहे. 

24 तास आपत्ती निवारण कक्ष सुरू...!

पावसाळ्यात निर्माण होणार्‍या आपत्कालीन परिस्थितीसाठी मालवण तहसील कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून हा कक्ष 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत 24 तास सुरु राहणार आहे. या कक्षामार्फत आपत्ती निवारणासाठी तालुक्याच्या शासकीय यंत्रणेतील वर्ग 4 चे 28 कर्मचारी, वर्ग 3 चे 65 कर्मचारी तसेच मालवण तहसील कार्यालयातील वर्ग 3 व 4 मधील कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच आपत्ती काळात माहिती व मदतीसाठी नियंत्रण कक्षाच्या 02365 - 252045 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.