Tue, Apr 23, 2019 05:51होमपेज › Konkan › शहीद जवानांच्या गावात उभारणार स्मारक

शहीद जवानांच्या गावात उभारणार स्मारक

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 02 2018 11:14PMदेवरूख : प्रतिनिधी

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने कोकणातील पहिले शहीद जवान स्मारक, परमवीरचक्र दालन व सैनिक मानवंदना उद्यान देवरूख येथे उभारले आहे. याच्या उद्घाटन प्रसंगी कारगील युद्धात सहभागी झालेले परमवीर चक्रप्राप्त ग्रेनेडियर योगेंद्रसिंह यादव हे उपस्थित होते. हीच प्रेरणा घेऊन जिल्ह्यातील शहीद जवानांच्या गावात स्मारक उभारण्याचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी जाहीर केले आहे.अशी 39 स्मारके पूर्णत्वास जाणार आहेत.

राष्ट्रसेवा हीच ईश्‍वर सेवा हे तत्त्व देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने जपले आहे. देशाप्रति बलिदान करणारे शूर जवान व त्यांचा इतिहास नव्या पिढीला माहीत व्हावा व त्यांनाही सैन्यदलात जाण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून शहीद जवानांच्या गावातच मोठ्या शाळेत स्मारक उभारले जाणार आहे. शहीद जवानांचा अर्धपुतळा, त्यांची संपूर्ण माहिती, स्मारकावर छत्री असे या स्मारकाचे स्वरूप असणार आहे.

कोकणातील लोकांनी देशासाठी खूप काही योगदान दिले आहे.नररत्नांची ही भूमी आहे.जिल्ह्यातील 39 शहीद जवानांची माहिती मिळवण्यात आली आहे. यामध्ये खेडमधील सर्वाधिक 21 जवानांनी भारतभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.

संगमेश्‍वर तालुक्यातील  बुरंबी, मुचरी, कारभाटले, बोरसूत या गावांमध्ये स्मारक उभारले जाणार आहे. या चार गावांत प्रथम स्मारक बांधणीला सुरुवात होणार आहे. या सर्व स्मारक उभारणीसाठी निधी संकलनाची जबाबदारी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ घेणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे जिल्ह्यातून स्वागत होत आहे.सदानंद भागवत, मदन मोडक यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.