Sat, Jul 20, 2019 21:39होमपेज › Konkan › आंबा बागायतदारांवर सरकार मेहेरबानी करीत नाही : राणे

आंबा बागायतदारांवर सरकार मेहेरबानी करीत नाही : राणे

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 10:20PMरत्नागिरी : प्रतिनिधी

आंबा बागायतदारांची परिस्थिती कर्जबाजारीपणाची झाली आहे. सरकारी अधिकारी, विमा अधिकारी, बँकांचे मॅनेजर दादागिरी करतात. शासनाने जीआर काढूनही विम्याचे, व्याजाचे हप्‍ते दिले नाहीत तरीही आम्ही गप्प बसतो. यापुढे लाचारीने काही मागायचे नाही तर हक्‍काने मागायचे नाही. येत्या आठ ते दहा दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन आंबा उत्पादकांचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन कोकणचे नेते व खा. नारायण राणे यांनी दिले. रत्नागिरी जिल्हा आंबा व्यावसायिक संघाच्या वतीने येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. 

यावेळी महाराष्ट्र स्वाभिमानचे सरचिटणीस माजी खा. निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाचेे तुकाराम घवाळी आदी उपस्थित होते. यावेळी प्रकाश साळवी यांनी आंबा बागायतदारांच्या व्यथा मांडून विविध मागण्यांचे निवेदन खा. राणे यांना दिले.

यावेळी खा. राणे म्हणाले, ऊस, कापूस, सोयाबीन, कांदा उत्पादक अडचणीत असले की तेथील पुढारी त्यांच्या पाठीशी उभे राहतात. मात्र, कोकणातल्या आंबा उत्पादकांसाठी येथील पुढार्‍यांनी भेट घेतल्याचे आठवत नाही, असे राणे म्हणाले. आंबा हा फळांचा राजा समजला जातो. पण त्यांची आज परिस्थिती काय आहे. त्यांना कर्ज, विम्याचे पैसे, कर्जाचे हप्‍ते यासाठी लाचारीने मागणी करावी लागते.

कर्ज पुनर्गठीत करुन सरकार बागायतदारांवर मेहेरबानी करीत नाही. सरकारने व्याज भरले नाही, विम्याचे पैसे दिले नाही तरी पण आपण गप्प बसतो. सिंधुदुर्गात 6 कोटी विम्यापोटी भरले. मात्र, 30 कोटी आपण मिळवून दिले. कोणाही अधिकार्‍याची बागायतदाराला बोलायची हिंमत झाली नाही. शिवसेना सत्तेत आहे, रामदास कदम नेहमी ताठ राहून बोलत असतात, शेतकर्‍यांना काय त्याचा फायदा. मंत्र्यांची मोठमोठी नावे आहेत. मात्र, शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्‍कासाठी काय करतात, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. यापुढे आपण असे चालू देणार नाही. आंबा बागायतदार श्रीमंत झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांसोबत बसून हे प्रश्‍न मार्गी लावू

आंबा मुंबईत दाखल झाला की अफवा पसरवून व्यापारी भाव पाडतात. मात्र, आमचे उत्पादक त्यांना चॅलेंज देत नाहीत ही परिस्थिती बदलली पाहिजे. आंब्यावर प्रोसेसिंग करणारे युनिट याठिकाणी झाले पाहिजे. आंबा बागायतदार एकत्र आले तरच ही परिस्थिती बदलणार आहे. जोपर्यंत कोकणात येऊन व्यापारी आंबा खरेदी करीत नाहीत तोपर्यंत उत्पादकांची परिस्थिती सुधारणार नाही, असेही खा. राणेंनी स्पष्ट केले. येत्या आठ ते दहा दिवसांत आंबा बागायतदारांबरोबर आपण मुख्यमंत्र्यांसोबत बसून हे प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन त्यांनी दिले.