होमपेज › Konkan › नाणार प्रकल्प आता विजयदुर्ग खाडीत बुडवूया!

नाणार प्रकल्प आता विजयदुर्ग खाडीत बुडवूया!

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 10:10PMखारेपाटण : वार्ताहर

प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्प व त्या अनुषंगाने विजयदुर्ग खाडीत होणारे धरण या विरोधात खारेपाटण दशक्रोशीसह खाडीपट्ट्यातील  जनता आता एकजूट होत आहे. या प्रकल्पा विरोधात जनतेमध्ये तीव्र असतोंष वाढत असून, चिंचवली रेल्वे स्टेशन संघर्ष समितीतर्फे सोमवारी चिंचवली येथे नाणार रिफायनरी विरोधात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  हा प्रकल्प तसेच प्रकल्प आणू पहाणारे सरकार विजयदुर्ग खाडीत बुडविल्याशिवाय आपण वाचणार नाही, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.  

 दशक्रोशी संघर्ष समितीचे अध्यक्ष नासीर काझी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस जि.प.सदस्य बाळा जठार, संघर्ष समिती वैभववाडी तालुका उपाध्यक्ष बाळा हरयाण, पं.स.सदस्य सौ.तृप्ती माळवदे, श्रीकांत भालेकर, माजी सरपंच  किशोर माळवदे, माजी सरपंच अनिल पेडणेकर, ग्रा.पं.सदस्या सौ.सत्यवती गवाणकर आदी उपस्थित होते.नाणार प्रकल्प विरोधात एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या नियोजित धरणाविरोधात खाडी पट्ट्यातील 25 गावातील नागरिक देशोधडीला लागणार असल्याची भीती नासीर काझी यांनी व्यक्त केली. 

या प्रकल्पाच्या विरोधात पेटून उठण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. सरकार जनतेची दिशाभूल करीत आहेत. कोणत्याही प्रकारची योग्य माहिती दिली जात नाही. जनतेला अंधारात ठेवून छुपा सर्व्हे सुरु आहे. अशी सर्व्हे करणारी माणसे  परिसरात आढळल्यास तात्काळ संघर्ष समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.  नाणार रिफायनरी प्रकल्प आपल्या मुळावर उठणारा आहे. यासाठी वेळीच जागे होवून हा प्रकल्प रद्द करूया, अथवा पिढी आपणास माफ करणार नाही. यापुढे धरण बाधित प्रत्येक गावांमध्ये प्रत्येक दिवशी एक बैठक घेण्याचा ठराव घेण्यात आला. 

नाणार रिफायनरी  प्रकल्प रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यात हातपाय पसरत आहे. कोकणच्या पर्यटन क्षेत्राची वाट लावणार आहे. मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधी खोटे बोलत, बातम्यांचे खोटे खुलासे करत डोळ्यात धुळफेक करत असल्याचा आरोप श्री. काझी यांनी केला.  प्रकल्पासाठी पाईपमधून पाणी पुरवठा करणार हे वृत्तच चुकीची असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

खारेपाटण - चिंचवली रेल्वे स्टेशनसाठी परिसरातील50 गावे एकत्र आली. त्यात सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा समावेश होता.तशीच एकजूट यावेळी दाखवूया, असे आवाहन करण्यात आले.  या सरकारला विजयदुर्ग खाडीत  बुडविले पाहिजे तरच नाणार प्रकल्प रद्द होईल. अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.  माजी सभापती बाळा हरयाण, जि.प.सदस्य बाळा जठार यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अनिल खोत यांनी मानले.