Thu, Jul 18, 2019 04:10होमपेज › Konkan › उच्चपदस्थ अधिकारी म्हणून आम्हाला भेटा!

उच्चपदस्थ अधिकारी म्हणून आम्हाला भेटा!

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 04 2018 10:57PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनीअरच नव्हे, तर हवाईसुंदरी बनायचे असले, तरी चालेल; पण जे काय बनायचे असेल त्याचे ध्येय आताच निश्‍चित करा आणि त्या दिशेने जाण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत आणि अफाट कष्ट करा, या जिल्हा परिषदेने आम्हाला ‘इस्रो’ची सहल घडवली आणि आता या उच्च पदावर काम करतोय, असे आम्हाला भेटल्यावर सांगा, तोच आनंद आम्हाला सर्वात मोठा असेल, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी विद्यार्थ्यांना केले.

सिंधुदुर्ग जि. प. च्या सिंधुदुर्ग टॅलेंट परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत मुलांना जिल्हा परिषदेच्या वतीने विमानाने ‘इस्रो’ची सफर घडविण्यात आली होती. या सहलीत सहभागी मुलांनी बुधवारी  खा. नारायण राणे यांची पडवे येथील लाईफटाईम मेडिकल कॉलेजमध्ये भेट घेतली. त्यावेळी या मुलांना मार्गदर्शन करताना खा. नारायण राणे बोलत होते.  जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, सुरेश सावंत आदी उपस्थित होते. 

मुलांनी थेट खा. राणे यांची भेट घेत त्यांच्याकडून जीवनाचे रहस्य समजावून घेतले. मार्गदर्शन करताना खा. राणे यांनी आपला जीवनक्रम या मुलांसमोर मांडत आपल्या यशस्वीतेचे रहस्य सांगितले. खा. राणे  म्हणाले, मी राजकारणात येण्यापूर्वी सात नोकर्‍या केल्या. एका गरीब कुटुंबात जन्मलेला असूनही केवळ   प्रचंड कष्ट, खूप मेहनत आणि प्रामणिकपणा या गुणांच्या बळावर यशस्वी झालो, नगरसेवकापासून ते थेट राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत यशस्वी काम केले. असे सांगितले. 

सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आपण मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो. ज्याच्यामुळे आपण यशस्वी झालो त्यांची आठवण आपण कायम ठेवणे आवश्यक आहे. आपल्यालाही जिल्हा परिषदेने चांगली संधी दिली. या संधीचे सोने करून आपल्याही जीवनात मोठी आकांक्षा ठेवा आणि त्या दिशेने परिश्रमपूर्वक मार्गक्रमण करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.जीवनात आपण काय बनणार हे आत्ताच निश्‍चित करा आणि या ध्येयाच्या दिशेने मार्गदर्शन करा. आत्ताच ठरवून टाका आपण कोणत्याही व्यसन वा वाईट गोष्टीला जवळ करणार नाही. कारण मला माझे करिअर बनवायचे आहे आणि माझ्या या करिअरच्या आड कोणतेच व्यसन किंवा वाईट गोष्ट येणार नाही. मग जीवनात आपण कुठेच कमी पडणार नाही. पुढे जाऊन आपण शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनीअर, आयएएस अधिकारी आदी बनाल आणि ज्यावेळी आम्हाला भेटाल त्यावेळी आम्ही जिल्हा परिषदेने नेलेल्या इस्त्रो सहलीतील आहोत आणि आम्ही आता हे बनलो आहोत, असे सांगाल तो आनंद आमच्यासाठी खूप मोठा असेल, असे सांगत या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत जिल्हा परिषदेचेही राणे यांनी कौतुक केले.

जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षकांचीही घेतली भेट

या विद्यार्थ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे तसेच पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांचीही भेट घेत जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाचे काम समजावून घेत त्यांच्याकडूनही पुढील जीवनात यशस्वी होण्याच्या टीप्स घेतल्या.