Wed, Jun 26, 2019 11:32होमपेज › Konkan › वैद्यकीय अधिकार्‍यांना भररस्त्यात मारहाण

वैद्यकीय अधिकार्‍यांना भररस्त्यात मारहाण

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 22 2018 11:00PMमालवण : प्रतिनिधी

रुग्ण दगावल्याच्या कारणावरून मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांना मंगळवारी दुपारी 3 वा. च्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्‍तींनी भररस्त्यात मारहाण करून पळ काढला. याबाबत डॉ. पाटील यांनी मालवण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्या दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

डॉ. बालाजी जनार्दन पाटील (मूळ रा. अहमदपूर, जि. लातूर, सध्या रा. मालवण) हे मंगळवारी दुपारी 2.45 वा. च्या सुमारास मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने जात होते. शहरातील हॉटेल रुचिरानजीक ते आले असता मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्‍तींनी त्यांच्यासमोर मोटारसायकल घालून त्यांना अडविले व आमचा रुग्ण उपेंद्र नेवाळकर याच्या मृत्यूस तुम्ही कारणीभूत आहात, असे बोलून त्यांना हातांनी मारहाण करत मोटारसायकलवरून त्या अज्ञातांनी पळ काढला. 

दोन दिवसांपूर्वी उपेंद्र नेवाळकर नामक 

रुग्ण मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णाला गोवा-बांबोळी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना उपेंद्र याचा मृत्यू झाला. मोटारसायकलवरून आलेल्या त्या दोघा अज्ञात तरुणांनी नेवाळकर याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत डॉ. पाटील यांना मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

याबाबत डॉ. पाटील यांनी त्या दोन अज्ञात व्यक्‍तींविरोधात भादंवि कलम 353, 332, 341, 504, 506 अन्वये तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्‍ती आणि वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांस प्रतिबंध अधिनियम 2010 कलम 4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील व हेड कॉन्स्टेबल नीलेश सोनावणे हे अधिक तपास करीत आहेत.