रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी
शुक्रवारपासून (1 जून) पावसाळी मासेमारी बंदी लागू होत आहे. 1 जून ते 31 जुलैपर्यंत सर्व यांत्रिकी बोटींनी होणारी मासेमारी पूर्णपणे बंद होणार आहे. केवळ वल्ह्याच्या होडीने समुद्रात कमी अंतरावर मासेमारी करण्याची मुभा आहे. अनेक यांत्रिकी बोट मालकांच्या अशा होड्या असून, पावसाळ्यातील बंदी काळात त्या होड्यांनी मासेमारी करून व्यवसाय केला जातो.या दोन महिन्यांच्या काळात यांत्रिकी बोटींची दुरुस्ती केली जाते.रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 4 हजार 300 नोंदणीकृत मच्छीमार बोटी आहेत. यामध्ये पर्ससीन, बुलनेट, ट्रॉलिंगच्या यांत्रिकी बोटी असून, अनेक छोट्या यांत्रिकी नौकासुद्धा आहेत. पर्ससीन बोटींना 1 जानेवारीपासून मासेमारी बंदी लागू झाली.
1 ऑगस्ट ते 30 डिसेंबरपर्यंत पर्ससीन मच्छीमार बोटींना मासेमारी करण्याची परवानगी आहे. 1 जानेवारीपासून अशा बोटींना 12 नॉटिकल मैल बाहेर मासेमारी करता येते. परंतु, आता पावसाळ्यात या बोटींसह इतर यांत्रिकी बोटींना 31 जुलैपर्यंत मासेमारी करता येणार नाही. बहुतांश पर्ससीन बोटी जेटीवर नांगरण्यात आल्या. काही बोटी बंदी झुगारून समुद्रात मासेमारीसाठी गेल्या आहेत. त्याही गुरुवारी रात्रीपर्यंत जेटीवर परत येतील. पावसाळी बंदी काळात मासेमारी करताना दुर्घटना घडली तर कोणतेही शासकीय सहाय्य मिळत नाही. त्याचबरोबर अशी मासेमारी करताना बोट सापडली तर कारवाईसुद्धा होते. त्यामुळे गुरूवारी रात्रीपर्यंत सर्व यांत्रिकी बोटी आपापल्या बंदरांत येऊन उभ्या राहणार आहेत.
यांत्रिकी बोट मालकांचा मत्स्य व्यवसाय पावसाळ्यात बंद राहू नये यासाठी अनेकांच्या छोट्या होड्या आहेत. या छोट्या होड्यांनी मासेमारी करून उदरनिर्वाह केला जातो. इतरांच्याही अशाच अनेक बोटी आहेत. दरम्यान, बंदी काळात मासेमारी पूर्णपणे बंद राहावी यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून सर्व मच्छीमार सहकारी संस्थांना कळवण्यात आले आहे. या संस्थांनी सदस्य असलेल्या मच्छीमारांना याची माहिती द्यायची आहे.
बंदी कालावधीत देखभाल दुरुस्ती
रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 4 हजार 300 नोंदणीकृत मच्छीमार बोटींपैकी 2500 ते 2600 कार्यरत असतात. या सर्व बोटी आता बंदरात उभ्या राहणार आहेत. पावसाळी बंदी काळात या बोटींची देखभाल दुरुस्ती केली जाते. यामध्ये इंजिनचे काम, रंगकाम अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश असतो.