Thu, Jul 16, 2020 08:57होमपेज › Konkan › जिल्ह्यातील माथाडी कामगार आज संपावर

जिल्ह्यातील माथाडी कामगार आज संपावर

Published On: Jan 29 2018 11:22PM | Last Updated: Jan 29 2018 10:59PMचिपळूण : खास प्रतिनिधी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग हमाल पंचायतीच्या वतीने 30 जानेवारी रोजी सरकारच्या कामगार हिताविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक संपाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील  हजारो माथाडी कामगार  मंगळवारी या संपावर जाणार आहेत.

याबाबत संघटनेचे अध्यक्ष अनिल शिंदे, वसंत कांबळी, प्रमोद घोले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालकधार्जिण्या सरकारने माथाडी कायद्याचेच अस्तित्व संपविण्याचे ठरविले आहे. दि. 10 फेब्रुवारी 2016 आणि 17 जानेवारी 2018 च्या परिपत्रकाप्रमाणे राज्यातील 36 माथाडी मंडळे बरखास्त करून एक महामंडळ निर्माण करण्याचा घात घातला आहे. शासनाच्या या धोरणाचा चिपळूण हमाल पंचायत आणि रत्नागिरी जिल्हा हमाल पंचायत यांनी निषेध केला आहे. माथाडी कायद्यातील अनेक कामगार हिताच्या तरतुदीचा कायदा निष्प्रभ करण्याचा प्रयत्न आहे. या विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील प्रमुख माथाडी कामगार संघटना संपावर जात आहे. माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी या आधी बाबा आढाव यांनी माथाडी कायदा मंजूर करून घेत आणि कामगारांना न्याय मिळवून दिला. तसेच कै. अण्णासाहेब पाटील, बाबा आढाव, बापूसाहेब मगदूम यांनी माथाडी कामगारांसाठी आपले जीवन समर्पित केले. त्यामुळे देशात एकमेव अशा  आपल्या राज्यात माथाडी कायदा निर्माण होऊन त्याची अंमलबजावणी सुरु झाली. मात्र, आता शासन मालकधार्जिणे धोरण आणत आहे, असा आक्षेप घेण्यात आला आहे. याचा निषेध करण्यासाठी माथाडी कामगारांनी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.