Wed, Jul 24, 2019 05:43होमपेज › Konkan › मार्लेश्‍वर तीर्थक्षेत्री भाविकांचा जनसागर!

मार्लेश्‍वर तीर्थक्षेत्री भाविकांचा जनसागर!

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 14 2018 11:55PM

बुकमार्क करा
देवरूख : प्रतिनिधी 

सह्याद्री पर्वत रांगांवर वसलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्‍वर व साखरपा येथील गिरिजादेवी यांचा कल्याणविधी (विवाह सोहळा) रविवारी ‘हर हर मार्लेश्‍वर’, ‘शिव हरा शिव हरा’च्या गजरात रविवारी हिंदू लिंगायत पद्धतीने सुमधूर मंगलाष्टकांसह दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी पार पडला. राज्यातील लाखो भाविक, तसेच प्रमुख मानकर्‍यांच्या उपस्थितीत थाटामाटात हा सोहळा पार पडला. 

प्रतिवर्षाप्रमाणे मकरसंक्रांत दिनाचे औचित्य साधून,  रविवारी कल्याणविधीचे आयोजन केले होते. हा विवाह सोहळा धार्मिक विधीनुसार मार्लेश्‍वर देवतेच्या गुहेसमोरील सभा मंडपात पार पडला. हा विधी पार पडत असताना गुहेतील देवतेला याचे दर्शन घडणे आवश्यक असते व याची यावेळी काळजी घेण्यात आली होती.

या सोहळ्याप्रसंगी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आ. सदानंद चव्हाण, आ. राजन साळवी, शिवसेना  जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, जि. प. सदस्या नेहा माने, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांच्यासह मार्लेश्‍वर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.