Thu, Apr 25, 2019 07:30होमपेज › Konkan › देवरूखात साकारणार नौसेनेसह सामुद्रिक इतिहास 

देवरूखात साकारणार नौसेनेसह सामुद्रिक इतिहास 

Published On: Dec 11 2017 1:30AM | Last Updated: Dec 10 2017 9:59PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

देशासह भारताच्या नौसेनेचा इतिहास तरुण पिढीसह सर्वसामान्यांना माहिती व्हावा, यासाठी नौदलाची, भारताचा सामुद्रिक इतिहास संस्था संपूर्ण देशात ऐतिहासिक तत्त्वाचे प्रदर्शन सादर करणार आहे. त्याची सुरूवात देवरूखातून होणार आहे. साडवलीतील पी.एस. बने इंटरनॅशनल शाळेच्या मैदानावर येत्या मंगळवारी आणि बुधवारी हे प्रदर्शन मांडले जाणार आहे. ‘हिस्टोरिया 2017’ नावाचे हे प्रदर्शन जिल्ह्यात आणि तेही प्रथम देवरूखात व्हावे, यासाठी जिल्हा परिषद सदस्य रोहन बने यांनी पुढाकार घेतला.

नौसेना युनिटच्या अखत्यारितील भारतीय सामुद्रिक इतिहास संस्थेचे कार्य 1978 पासून सुरू झाले. भारताचा सामुद्रिक इतिहास आणि भारतीय नौसेनेचा इतिहास जतन करण्याचे कार्य या संस्थेकडून केले जाते. हा जतन केलेला इतिहास युवा पिढीसह देशवासीयांना कळावा, यासाठी संपूर्ण देशभर प्रदर्शन केले जाणार आहे. त्याचा पहिला मान देवरूखला मिळाला आहे. यासाठी रोहन बने यांनी संस्थेचे पार्टनर असलेल्या आणि होस्ट करणार्‍या कसबा डिझाइन कंपनीशी संपर्क साधून हे यश साध्य केले आहे. या प्रदर्शनात नौसेनेचे कमोंडर ओडक्‍कल जॉन्सन उपस्थित राहून जनतेला आवश्यक माहिती देणार आहेत.

या प्रदर्शनात शत्रू देशाला हरवून त्यावेळी जमविलेल्या ऐतिहासिक वस्तू, शस्त्रास्त्र, पानबुड्यांचे तुकडे, जहाजांचे अवशेष पहावयास मिळणार आहेत. त्याचबरोबर भारताला मित्र देशांनी अनेक भेटवस्तू दिल्या असून त्याही या प्रदर्शनास पहावयास मिळणार आहेत. 

पी.एस.बने इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर मंगळवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. दुसर्‍या दिवशी बुधवारी समारोप होणार आहे. माजी आ. सुभाष बने यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सुपुत्र रोहन बने वेगवेगळ्या संकल्पना राबवून भावी पिढीचा ज्ञानविकास साधण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी त्यांनी देवरूखातच साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. हे प्रदर्शन यशस्वी व्हावे यासाठी श्‍वेता पावळे आणि डी. आर. लिंगायत यांच्यासह माजी आ. सुभाष बने प्रयत्नशील आहेत. या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.