होमपेज › Konkan › सागरी सुरक्षा रक्षकच असुरक्षित

सागरी सुरक्षा रक्षकच असुरक्षित

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 22 2018 9:11PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

जिल्ह्यातील सागरी सुरक्षा रक्षकांची साडेसाती अजूनही संपलेली नाही. त्यांचे गेल्या 7 महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. जिल्ह्यात 68 सागरी सुरक्षा रक्षक असून 30 सप्टेंबरपर्यंत वेतन न मिळाल्यास सहायक कामगार आयुक्‍त कार्यालयाला घेराव घालण्याचा विचार सुरू केला आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्याने सुरक्षा रक्षकांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे.
सागरी किनार्‍यांच्या सुरक्षिततेच्या द‍ृष्टीने 3 वर्षांपूर्वी सागरी सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात आली. सध्या 23 लँडिंग पॉईंटवर त्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. सकाळ, दुपार, रात्र पाळीनुसार सुरक्षा रक्षकांना ड्युटी करावी लागते. काही लँडिंग पॉईंट असे आहेत की, तेथे वाहनानेच जावे लागते. अनेक ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, अशा निर्जन ठिकाणी काम करावे लागते. गेल्या तीन वर्षांत या सुरक्षा रक्षकांना महिन्याचा महिन्याला पगार मिळालेला नाही. आता तर गेल्या 7-8 महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीत.

गणेशोत्सव तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत पगार न मिळाल्याने सुरक्षा रक्षकांमध्येच असुरक्षिततेेची भावना निर्माण झाली आहे. येत्या 30 तारखेपर्यंत पगार न मिळाल्यास सहायक कामगार आयुक्‍त कार्यालयाला घेराव घालण्याचा विचार सुरू झाला आहे. सुरक्षा रक्षकांचा वेतनाचे अनुदान कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे येते. प्रत्येकी 14 हजार 812 रूपयांचे वेतन सागरी सुरक्षा रक्षकांच्या बँक खात्यात जमा होते.

सागरी सुरक्षा रक्षकांचे वेतन अनुदान वेळेत मिळावे, यासाठी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्‍तांनी पाठपुरावा करण्याची आवश्यकता असते. गेल्या महिन्यात मुंबईत मत्स्यालय अधिकार्‍यांसोबत याबाबत बैठक झाली. त्यावेळी सागरी सुरक्षा रक्षकांची नेमणूक तात्पुरत्या स्वरुपांची असल्याने त्यांचे वेळेत पगार होत नाहीत, अशी भूमिका मांडली गेली होती. त्याचवेळी ते काम सोडत नाहीत, तोपर्यंत कायम आहेत, असेही त्या बैठकीत संबोधण्यात आले. 

मत्स्यालय विभागाकडून 5 कोटी रुपयांचे अनुदान मागणी करण्यात आली. त्यापैकी 70 टक्के अनुदान प्राप्त झाले नसल्याचेही या बैठकीत एका प्रश्‍नाला उत्तर देताना मत्स्यालय अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. इतके महिने पगार न झाल्याने सागरी सुरक्षा रक्षक असुरक्षित आणि कुटुंबाच्या पाठी साडेसाती लागल्यासारखे झाले आहे. त्यामुळे आगामी काळात घेराव घालण्यात येणार आहे.