Thu, Apr 25, 2019 15:27होमपेज › Konkan › सागरी सुरक्षा रक्षक मानधनाविनाच!

सागरी सुरक्षा रक्षक मानधनाविनाच!

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:26AMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

सहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अखत्यारित काम करणार्‍या सागरी सुरक्षा रक्षकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधनच मिळालेले नाही. प्रभारी सहायक आयुक्त आनंदाराव साळुंखे यांनी त्यांचे मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्नच न केल्याने सुरक्षा रक्षकांना उसनवारी करून कामाच्या ठिकाणी यावे-जावे लागत आहे. त्याचबरोबर कुटुंबांवरही उपासमारीची वेळ आली आहे.

सहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अखत्यारित काम करण्यासाठी प्रारंभी 74 सागरी सुरक्षारक्षक नेमण्यात आले. त्यांचे मानधन कामगार आयुक्तालयामार्फत येते. मात्र, त्यासाठी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी भेटून, पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणे अपेक्षित असते. गेल्या सहा महिन्यांपासून मानधनच न मिळाल्याने मत्स्य व्यवसाय विभागाकडून त्यासाठी पाठपुरावा झाला आहे की नाही, याबाबत साशंकता निर्माण होत आहे. सागरी सुरक्षा आणि अनधिकृत मासेमारीवर अंकुश असावा 

म्हणून सागरी सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात आली. सध्या सुमारे 60 सुरक्षा रक्षक कार्यरत असल्याचे समजते. समुद्राच्या ठिकाणी लँडिंग पॉईंटवर त्यांना दिवस-रात्र सजग रहावे लागते. येणार्‍या-जाणार्‍या मच्छीमार बोटींची माहिती, त्या बोटीतून येणार्‍या-जाणार्‍यांची यादी ठेवावी लागते.

अनेक लँडिंग पॉईंटवर जाण्यासाठी कोणत्या ना कोणत्या वाहनाचा वापर करावाच लागतो. त्याचबरोबर काही लँडिंग पॉईंट असे आहेत की, जेथे मनुष्य वस्ती फारच विरळ आहे. दुकानेही जवळपास नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना काम करावे लागत आहे. परंतु, त्याचा मोबदला वेळेत मिळत नसल्याने बहुतांश सुरक्षा रक्षकांना उसनवारी करून स्वत:सह कुटुंबाचा दिवस ढकलावा लागत आहे. त्यामुळे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी तातडीने दखल घेऊन त्यांचे मानधन मिळेल, यासाठी अपेक्षित तो सर्व पाठपुरावा करावा, अशी मागणी केली जात आहे.