Sun, Jul 21, 2019 17:02
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › सागरी सुरक्षारक्षकांचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले

सागरी सुरक्षारक्षकांचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 01 2017 10:57PM

बुकमार्क करा

मालवण :  वार्ताहर

राज्याच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने 720 किमी लांबीच्या किनारपट्टीवरील 525 लँडिंग पॉईंटपैकी 91 पॉईंट नौदलाने या पूर्वीच संवेदनशील घोषित केले आहेत. याठिकाणी ये-जा करणार्‍या नौकांची व खलाशांची नोंद ठेवण्यासाठी जानेवारी 2016 पासून 24 तास 273 सुरक्षा रक्षक व 23 पर्यवेक्षक यांची कंत्राटी पद्धतीने शासनाने मत्स्य विभागाच्या अखत्यारीत नेमणूक केली. मात्र, सागरी सुरक्षेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या या सुरक्षा रक्षकांचे मानधन  सहा महिन्यांपासून रखडले आहे.

दरम्यान, निधीची उपलब्धताच नसल्याने सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षक यांच्या खात्यात मानधन जमा न झाल्याची कबुली सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने दिली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही मानधन मिळत नसतानाही प्रामाणिकपणे सेवा बजावणार्‍या सुरक्षा रक्षकांचा संयम सुटत चालला आहे. 

जानेवारी 2016 पासून नेमणुका

राज्याच्या किनारपट्टीवर पालघर - सुरक्षा रक्षक 54, पर्यवेक्षक - 3, ठाणे - सुरक्षा रक्षक 18, पर्यवेक्षक - 2, मुंबई उपनगर - सुरक्षा रक्षक 21, पर्यवेक्षक - 2, मुंबई शहर - सुरक्षा रक्षक 9, पर्यवेक्षक - 1, रायगड - सुरक्षा रक्षक 60, पर्यवेक्षक - 5, रत्नागिरी - सुरक्षा रक्षक 69, पर्यवेक्षक - 5, सिंधुदुर्ग सुरक्षा रक्षक 42 (दोन रिक्‍त), पर्यवेक्षक - 5 अशा एकूण 273 सुरक्षा रक्षक व 23 पर्यवेक्षकांची जानेवारी 2016 साली नियुक्ती करण्यात आली. या सर्वांचे ठरवून दिलेले मानधन एप्रिल 2017 पर्यंत नियमित बँक खात्यात जमा होत होते. मात्र, गेले सहा महिने त्या सर्वांचे मानधन निधीअभावी रखडले आहे.सुरक्षा रक्षक लँडिंग पॉईंटवर दिवसरात्र सेवा बजावतात. मात्र, त्या ठिकाणी निवारा शेड व्यवस्था करण्यात आलेली नाही. सुरक्षा रक्षकांना ड्रेसकोडही अद्याप प्राप्त झाला नाही. स्वतःची सुरक्षा करण्यासाठी त्यांच्याकडे कोणते हत्यारही नाही याबाबतही शासनाने लक्ष द्यावा, अशी मागणी केली जात आहे. 

सहा महिने वेतन नाहीच....

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने आम्हा सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षकांची नियुक्‍ती केली आहे. मानधन किती मिळते, कमी की जादा याबाबत आमची सद्यस्थितीत कोणतीही तक्रार नाही. मात्र गेले सहा महिने आमचे मानधन मिळालेले नाही. प्रामाणिकपणे सेवा बजावत असताना अन्य कोणतेही उत्पनाचे साधन नसल्यामुळे शासनाने लक्ष द्यावा, ही आमची मागणी आहे. मात्र मानधन मिळाले नाही,  म्हणून आमच्या सेवेवर परिणाम होऊ दिला जाणार नाही. प्रामाणिकपणे यापुढेही सागरी सुरक्षेची जबाबदारी पार पाडली जाईल, असे सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षक यांनी सांगितले.