होमपेज › Konkan › मराठी शाळांनी दर्जा टिकवणे गरजेचे

मराठी शाळांनी दर्जा टिकवणे गरजेचे

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 06 2018 11:46PMदापोली : वार्ताहर

मराठी माध्यमांच्या शाळांचा पट हा कमी-कमी होत जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांचा समाजाशी संपर्क असणे खूपच गरजेचे आहे. यासाठी मराठी माध्यमांच्या शाळांनी आपला दर्जा टिकवणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी दापोली येथे व्यक्‍त केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ आयोजित शैक्षणिक कृतीसत्र कार्यक्रमाच्या समारोप समारंभी व्यक्‍त केले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ यांच्यावतीने दापोली शहरातील सेवाव्रती शिंदे गुरूजी सभागृह, नवभारत छात्रालय येथे दोन दिवसीय मुख्याध्यापकांचे शैक्षणिक कृतीसत्र आयोजित करण्यात आले होते. दि. 5 मे रोजी समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होत. यासाठी व्यासपीठावर दापोलीचे आ. संजयराव कदम, पंचायत समिती सभापती चंद्रकांत बैकर, उपसंचालक कोल्हापर श्री. गोंधळी, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, सचिव आदिनाथ थोरात, संदेश राऊत, विद्या समितीचे अध्यक्ष श्री. संदिपान मस्तूद, जिल्हाध्यक्ष श्री. विजय पाटील, विनायक राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्री. म्हमाणे म्हणाले की, स्वयंअर्थशासित तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत. माझ्याकडे परवानगी घेण्यासाठी या शाळांची रिघ लागलेली असते. पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी पाहिजे तेवढी रक्कम खर्च करण्यास त्यांची तयारी आहे. मात्र, अशा शाळांमधून शिक्षण घेत असताना संबधित शाळांना शासनाची परवानगी आहे का, तसेच तेथील शिक्षक वर्ग हा योग्य प्रशिक्षण घेतलेला आहे का? याची माहिती घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या मुलांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून पालक प्रयत्नशील असतात. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांनी आपला दर्जा टिकवणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या पटावर परिणाम होणार नाही हे लक्षात घेण्याचे आवाहन श्री. म्हमाणे यांनी केले.

प्रत्येक शाळेत शिपाई व क्लार्क असावा, यासाठी आपण लवकरच निर्णय घेणार आहोत, असेही यावेळी श्री. म्हमाणे यांनी जाहीर केले. तसेच शालार्थ प्रणाली जूनपासून सुरू होणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले. ज्या शाळांची संचमान्यता दुरूस्ती करायची आहे. त्यांना अजूनही संधी असून, त्यांनी त्वरित दुरूस्ती करून घ्यावी. अतिरिक्त शिक्षकांना ज्या शाळा समायोजित करून घेणार नाही त्या शाळेतील ते पद रद्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दि. 1 व 2 जुलै घोषित झालेल्या शाळांमध्ये मोठा घोळ झाल्याचे सांगत या घोषित शाळांमध्ये स्वयंअर्थसहाय्यित शाळा तसेच ज्या शाळा अस्तित्वातच नाहीत अशा शाळेचाही यामध्ये समावेश असल्याने याच्या चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी दापोलीचे आमदार संजय कदम यांनी शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारावर चांगलेच तोंडसुख घेतले. 20 टक्के अनुदान प्राप्त शाळांना पुढचा टप्पा केव्हा देणार केवळ आश्वासन नको द्यायचे असल्यास निश्चित वेळ सांगा अथवा पुढील टप्पा देता येणार नाही असे तरी जाहीर करा, असा सवाल उपस्थित अधिकार्‍यांना केला. पटसंख्येअभावी शिक्षक कमी होत आहेत तसेच  डोंगरी भाग असल्याने शाळा बंद होत आहेत. कोकण हा डोंगराळ भाग असल्याने येथे पटसंख्या संदर्भातील निकष शिथिल करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, उपसंचालक कोल्हापूर श्री. गोधळी, मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्रराज्य मुख्याध्यापक संघटनेचे हिशोब तपासणीस संदेश राऊत यांनी शैक्षणिक कृतीसत्राचा दोन दिवसीय कार्यक्रम आपल्या सहकार्यांच्या मदतीने उत्कृष्टपणे पार पाडल्यामुळे त्यांचा श्री. गंगाधर म्हमाणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

दोन दिवसीय चाललेल्या या कृतीसत्राला महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, जळगाव, नंदुरबार, नाशिक, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.