Mon, Jun 24, 2019 21:36होमपेज › Konkan › मराठा समाजाचा जेलभरोचा निर्धार

मराठा समाजाचा जेलभरोचा निर्धार

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 8:43PMकणकवली : वार्ताहर

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठीची निर्णायक लढाई सुरू आहे. त्यामुळे सर्वांनी  एकत्र येत 9 ऑगस्ट रोजी जेलभरो आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार मराठा समाजबांधवांकडून करण्यात आला. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असून त्याला कोणतेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. जेलभरो आंदोलनासाठी विभागनिहाय बैठकांचे नियोजन करताना महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. 

सकल मराठा समाजबांधवांची बैठक येथील मराठा मंडळ येथे घेण्यात आली. ज्येष्ठ नेते एस. टी. सावंत, लवू वारंग, सभापती सौ. भाग्यलक्ष्मी साटम, योगेश सावंत, सुशील सावंत, भाई परब, सोनू सावंत, प्रताप भोसले, अ‍ॅड. हर्षद गावडे, सुशांत नाईक आदी मराठा बांधव उपस्थित होते. जेलभरो आंदोलन 9 ऑगस्ट रोजी होणार असून त्यासाठी कणकवली शहरात पाध्ये मेडीकल शेजारी कार्यालय सुरू करण्याचे ठरविण्यात आले. त्याचे उद्घाटन शुक्रवार सकाळी 10 वा. करण्यात येणार आहे. जेलभरो आंदोलनाविषयी जनजागृतीसाठी विभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. रविवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. कळसुली विभागाची बैठक हळवल ग्रा. पं. येथे होणार आहे. 11 वा. नाटळ विभागाची बैठक कनेडी समाधीपुरूष हॉल येथे होणार आहे. सोमवार 6 ऑगस्ट रोजी फोंडाघाट विभागाची बैठक 10 वा. फोंडाघाट रेस्टहाऊस, खारेपाटण विभागाची बैठक दु. 3 वा. खारेपाटण विद्यालय तर कासार्डे विभागाची बैठक सायं. 6 वा. कासार्डे विद्यालय येथे होणार आहे. 

जेल भरो आंदोलनासाठी मराठा बांधवांनी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा. कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र यायचे आहे. त्यानंतर आपल्याला अटक करून घ्या, असे पोलिसांना सांगून जेलभरो करावयाचा आहे. हे आंदोलन शांततेने करावयाचे आहे. प्रशासनाकडूनही तसे सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.  मराठा समाजाचे आंदोलन हे आपल्या न्याय हक्कांसाठी आहे. ते कोणत्याही समाजाविरोधात नाही.  त्यामुळे मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने  या आंदोलनात सहभागी व्हावे, असा निर्धार बैठकीत करण्यात आला.